बीड – सीएचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड शहरातील पांगरी रोडवरील शिवतेज काॅलनी परिसरात घडली आहे. वरद मनोजसिंग जव्हेरी (वय 21, बीड) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. विद्यार्थ्याने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.
वरद हा सीएचे शिक्षण घेत होता. मात्र, तो सतत अभ्यासाचा ताण घेत असे. घटनेच्या दिवशी वडील कामानिमित्त बीड शहरात गेले, तर आई इतर भावंडांसोबत बारामती येथे नातेवाइकांकडे गेली होती. वरद एकटाच घरी होती. वडील काम आटोपून घरी आले तेव्हा घराच्या दरवाजा आतून लावल्याचे दिसले. त्यांनी मुलगा वरदला वारंवार आवाज दिला. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. नंतर दरवाजा तोडून मनोजसिंग जव्हेरी हे घरात शिरले असता वरदने दोरीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेतल्याचे आढळले. बीडच्या शिवाजी नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून याप्रकरणी मृत्यूची आकस्मात नोंद करण्यात आलीय. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.