प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 7 -एमपीएसी गट-क सेवा मुख्य परीक्षेत मोबाइल, ब्लूटुथ मायक्रो स्पीकरच्या सहाय्याने प्रश्नपत्रिका सोडविणाऱ्यावर आयोगाच्या भरारी पथाकाने कारवाई केली आहे. तर, या भामट्याला आता सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 13 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
केवलसिंग चेनसिंग गुशिंगे (वय 30, रा. गेवराई, ता. पैठण, जि. औरंगाबाद) असे अटक केलेल्या या उमेदवाराचे नाव आहे. तर, त्याच्या साथीदाराविरोधात सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी नऱ्हे येथील सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स ऍन्ड कॉमर्स महाविद्यालयात परीक्षा केंद्रात ही परीक्षा पार पडली. यावेळी ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव करत आहेत.
आयोगाला संबंधित विद्यार्थ्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्याला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसच्या माध्यमातून कॉपी करण्यापूर्वी संशयित हालचालीवरून आयोगाने त्याला पकडले. याप्रकरणी संबंधित विद्यार्थ्याला आम्ही अटक केली आहे.
– प्रमोद वाघमारे,
गुन्हे निरीक्षक, सिंहगडरोड पोलीस ठाणे