सेऊल – जपानच्या निकामी झालेल्या फुकुशिमा अणु प्रकल्पातून प्रशांत महासागरामध्ये पाणी सोडण्याच्या निर्णयाचा निषेध नोंदवण्यासाठी दक्षिण कोरियाच्या 30 हून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मंगळवारी सेऊललमधील जपानी दूतावासापुढे आपले केशवपन केले.
करोना साथीमुळे सध्या देशात 10 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास बंदी आहे. परंतु, पोलिसांनी जपान सरकारचा निषेध करणारे हे आंदोलन करण्यापासून विद्यार्थ्यांना रोखले नाही. त्यांनी केवळ घोषणाबाजी करणाऱ्या आणि निषेधाचे फलक फडकावणाऱ्या जमावाला वारंवार पांगवले.
अणू उर्जा प्रकल्पातील किरनोत्सर्ग झालेले पाणी समुद्रात सोडण्याच्या जपान सरकारच्या योजनेवर टीका करणारे संदेश देणारे फलक निदर्शकांनी डोक्यावर गुंडाळले होते. दूषित पाणी सोडण्याची योजना जपान सरकारने त्वरित रद्द करावी, असे या फलकांवर लिहीले होते.
फुकुशिमा अणु प्रकल्पातून सुमारे दोन वर्षांतील प्रक्रिया झालेले 1 दशलक्ष टनांहून अधिक पाणी प्रशांत महासागरात सोडण्यात येईल. अशी घोषणा जपान सरकारने गेल्या आठवड्यात केली होती. दक्षिण कोरियाने या निर्णयाचा तीव आक्षेप घेतला आहे.
देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जपानी राजदूतांना बोलावून घेऊन आपला आक्षेप नोंदवला. तर दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे-इन यांनी अधिकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.