सातारा – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा येथे 7 नोव्हेंबर 1900 रोजी तत्कालीन गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि सध्याच्या श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. हा दिवस या शाळेत विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. बार्टीकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रारंभी शाहू चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण सुनील जाधव, कार्यालय अधीक्षक मुकुंद गोरे, बार्टीचे प्रकल्प अधिकारी दिलीप वसावे, पत्रकार विजय मांडके, अनिल वीर, समाजकल्याण, बार्टी कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, समतादूत उपस्थित होते.
बार्टीच्या निबंधक इंदिरा आस्वार, प्रकल्प व्यवस्थापक नसरिन तांबोळी यांनी प्रतापसिंह हायस्कूलचे कार्यालय, प्रयोगशाळेतील जुनी उपकरणे यांची पाहणी केली. डॉ. बाबासाहेब यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेचा वारसा जपला पाहिजे. शाळेचा नावलौकिक राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी बार्टी व सामाजिक न्याय विभाग प्रयत्न करेल, असे आश्वासन इंदिरा आस्वार यांनी दिले.
विजय मांडके यांनी डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचा व इतिहासाचा आढावा घेतला. दिलीप वसावे यांनी प्रास्ताविक केले. विशाल कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. राहुल गंगावणे यांनी आभार मानले. प्रतापसिंह हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्मती देशमाने यांचे विशेष सहकार्य लाभले.