पुणे – सानिका वैद्य या जिद्दी मुलीने आपल्या दुर्धर आजारावर यशस्वीपणे मात करत राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन पदकांना गवसणी घातली. ऑटिझम (आत्मकेंद्रितपणा किंवा स्वमग्नता) या विकाराशी झुंजत असलेल्या सानिकाने या स्पर्धेत दुसरे स्थान मिळवताना ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात रजत तर, फ्री स्टाईल प्रकारात ब्रॉंझ पदक पटकावले.
ही स्पर्धा गेल्या आठवड्यात बेंगळुरूत पार पडली. ऑटिझमच्या विकारग्रस्त व्यक्तीला दैनंदिन आयुष्यात प्रचंड झगडा करावा लागतो. अशा व्यक्तीची मानसिक व शारीरिक स्थितीही अत्यंत नाजूक बनलेली असते. मात्र, सानिकाने या सगळ्यावर मात करत हे यश मिळवले.
अशा व्यक्तींना सातत्याने कोणाच्या तरी सोबतीची तसेच मदतीची गरज असते. सानिकाला हे सर्व सहकार्य तिची आई दीपाली सातत्याने करत आहेत. त्यांच्याच पाठिंब्यामुळे तसेच प्रोत्साहनामुळे तिने हे यश मिळवले आहे. मात्र, अशी परिस्थिती असतानाही सानिकाला जलतरणाची आवड निर्माण झाली व तिने सराव व स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास प्रारंभ केला. तिला तिचे प्रशिक्षक निल यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
तिने आजवरच्या वाटचालीत विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून राज्यस्तरीय पॅरा स्पर्धेत तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. आता तशीच चमकदार कामगिरी तिने राष्ट्रीय स्पर्धेतही केली आहे. करोनाच्या संकटामुळे देशात लॉकडाऊन झाले व त्यावेळी सानिकाचा जलतरणाचा सराव व स्पर्धांमधील सहभाग खंडित झाला होता.
अनलॉकनंतर जेव्हा सराव व स्पर्धा सुरू झाल्या तेव्हापासून तिने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची साक्ष दिली. या स्पर्धेत सहभागी होत असताना तिला सरावासाठी अत्यंत कमी काळ मिळाल्यानंतरही तिने हे यश मिळवले. वसंत विहार या स्पेशल मुलांच्या शाळेत सानिका शिकत आहे.