जिद्द आणि चिकाटीने सामान्य गृहिणी ते नगरसेविका बनलेल्या सुवर्णा बुर्डे

जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येते. स्वतःच्या ज्ञानाचा वापर, नागरिकांच्या समस्यांविषयी तळमळ आणि त्या समस्या सोडविण्याची जिद्द असली की राजकारणात यशाचा गुलाल उधळता येतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, पिंपरी चिंचवड महापालिकेतील नगरसेविका सुवर्णा बुर्डे होय. गृहिणी असताना त्यांनी काही छोट्या व्यवसायांच्या माध्यमातून आपला जनसंपर्क वाढविला. आज नगरसेविका म्हणून त्या राजकारणात यशस्वी वाटचाल करत आहेत.

सुवर्णाताईंनी चाकणमध्ये श्री शिवाजी मंदिरमध्ये पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. माहेरच वातावरणही राजकीय होते. त्यांचे वडील प्रसिद्ध गाडामालक व सामाजिक कार्यकर्ते आहेत. तसेच चुलत्यांनी सरपंचपद भूषविले आहे. त्यामुळे राजकारणाचे बाळकडू त्यांना माहेरीच मिळाले होते. शाळेत असताना त्या व्हॉलीबॉल खेळण्यामध्ये तरबेज होत्या. 2006 साली त्यांचा चऱ्होली येथील विकास बुर्डे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सासरीही राजकारणाची पार्श्‍वभूमी होती. मात्र सुरुवातीला सुवर्णाताईंनी राजकारणाकडे लक्ष दिले नाही. त्यांनी घर सांभाळत छोट्या-मोठ्या व्यवसायांना प्राधान्य दिले. घऱातील राजकीय वातावरणामुळे राजकारणाचे धडेही त्यांना मिळत होते.

व्यवसाय करत त्यांनी महिलांशी जनसंपर्क वाढविला. त्यातून महिलांच्या समस्या सोडवायला त्यांनी सुरुवात केली. महिलांना एकत्र केले की त्यांच्यामध्ये एकी निर्माण होते. त्यातून छोट्या व्यवसायांना चालना मिळेल हे सुवर्णा ताईंनी हेरले. त्यातून त्यांनी बचतगटांची स्थापना केली. त्या माध्यमातून विविध छोट्या-मोठ्या व्यवसायांना सुरुवात झाली. त्यातून महिलांना चार पैसे मिळू लागले. सुवर्णाताई घर, मुले सांभाळून व्यवसायामध्ये प्रगती करत होत्या. त्यासोबतच सामाजिक कार्याचा त्यांचा आलेखही वाढत होता. 2017 साली महापालिकेच्या निवडणुकीसाठी त्या चऱ्होलीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. बुर्डे परिवारांने केलेल्या कामाचा भक्कम आधार त्यांच्यापाठीमागे होता.

त्यामुळे नगरसेविका म्हणून त्या निवडून आल्या. त्यातून विवाहानंतर सुरु केलेल्या सामाजिक कामाला अधिकच बळकटी आली. नागरिकांसाठी सुरु केलेल्या कामाचा हळूहळू विस्तार होऊ लागला. प्रभागातील रस्ते, शाळा यांचा विकास करण्यावर त्यांनी भर दिला. रस्त्यांच्या बाजूला स्वच्छतागृह बांधण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सातत्याने पाठपुरावा करत त्यांनी प्रभागातील चऱ्होली फाटा, मॅगझिन चौक, जयगणेश साम्राज्य चौक याठिकाणी स्वच्छतागृहे बांधली. स्वच्छता अभियान राबवून प्रभागामध्ये स्वच्छता ठेवण्याचे म्हत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. सासरे वारकरी सांप्रदायिक असल्याने देहू व आळंदी या तीर्थक्षेत्रांकडे त्यांचा विशेष ओढा आहे. त्यातूनच वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. पालखी मार्गावर औषध, फळ वाटप तसेच अन्नदान त्या करतात. वारकऱ्यांची सेवा करण्यात खरे पांडुरंगाचे दर्शन असल्याचे त्या सांगतात.

नगरसेविका झाल्यानंतर महापालिकेच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम त्यांनी हाती घेतले. नागरवस्ती विभागाच्या विविध योजना त्यांनी नागरिकांना समजावून सांगितल्या. ज्ञानकौशल्य योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षणासाठी महिलांची मोट बांधली. शिवणकाम, ब्युटी पार्लर, इंग्रजी भाषा यासारखे प्रशिक्षणवर्ग घेतले. त्यामुळे महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. सन 2018-19 या वर्षी सुवर्णाताईंची शिक्षण समितीच्या सदस्यपदी निवड झाली. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यासाठी महापालिका शाळांतील गुणवत्ता सुधरविण्यावर त्यांनी भर दिला.

त्यासाठी सर्व सदस्यांना एकत्र घेत त्यांनी महापालिका शाळांना भेटी दिल्या. त्या शाळांमधील समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. प्रभागातील आठही महापालिका शाळांवर त्यांनी विशेष लक्ष दिले. तेथील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी वारंवार शिक्षकांच्या भेटी घेतल्या. राष्ट्रीय सणांला शाळांमध्ये उपस्थित राहत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सुवर्णाताई नगरसेवक झाल्यामुळे त्यांच्या प्रभागामध्ये विकासाला सुरुवात झाली. छोट-मोठ्या कार्यक्रमांमधून त्यांनी नागरिकांना एकत्र आणले . समस्या सोडविण्यासाठी नागरिकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. सुवर्णा यांची नुकतीच स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे. येणाऱ्या काळात नागरिकांसाठी जास्तीजास्त चांगली कामे करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. विशेषतः मुलींना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत. त्यासाठी लवकरच त्या मुलींना कराटे प्रशिक्षण देणार आहेत.

आपल्या वाटचालीबाबत सुवर्णाताई समाधानी आहेत. त्या म्हणाल्या, ‘जनतेने मोठ्या विश्‍वासाने लोकप्रतिनिधी म्हणून मला निवडून दिले आहे. त्यांचा विश्‍वास सार्थ करणे हे पहिले कर्तव्य आहे. एक महिला म्हणून घर व राजकारण या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत असताना घरच्या मंडळींनी खूप सहकार्य केले आहे. सासू-सासऱ्यांचा भक्कम पाठिंबा नेहमीच मला काम करण्यासाठी एक नवीन उर्जा देतो. प्रभागातील नागरिकांसाठी अजून खूप कामे करायची आहेत. मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे घेतले पाहिजे. ज्या क्षेत्रामध्ये त्यांना करिअर करायचे आहे त्यामध्ये जिद्द आणि चिकाटीने यश मिळविले पाहिजे.’ सुवर्णाताईंनी समाजसेवेचे घेतलेले व्रत त्यांना राजकारणात बळकटी देणार यामध्ये तीळमात्र शंका नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.