नागरिक, प्रवासी आणि विद्यार्थ्यांना अवघे 55 रुपये भरावे लागणार
पुणे – एसटी महामंडळाने आता हायटेकच्या दिशेने पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे, प्रवाशांना आर्थिक व्यवहार करणे सोपे जावे यासाठी महामंडळाच्या वतीने “स्मार्ट कार्ड’ योजना सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, प्रवाशांना प्रवास करण्यासह या कार्डच्या माध्यमातून एसटी महामंडळाच्या संबंधित आर्थिक व्यवहारही करणे शक्य होणार आहे. त्याशिवाय रेल्वे आणि विमानाची तिकिटे काढण्यासाठीही या कार्डचा वापर करता येणार आहे. हे कार्ड मिळविण्यासाठी सर्व प्रकारचे नागरिक, प्रवासी आणि विद्यार्थ्यांना अवघे 55 रुपये भरावे लागणार आहेत. या योजनेला राज्यातील एसटी महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर सुरुवात करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांच्या कालावधीत केंद्र शासनाने कॅशलेश व्यवहारांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सर्व शासकीय, निमशासकीय आणि अन्य संस्थांनी “कॅशलेश’ व्यवहारांना प्राधान्य द्यावे, असा आदेश या संस्थांना दिले होते. या आदेशाची बहुतांशी सर्व संस्थांनी अंमलबजावणी केली होती. मात्र, एसटी महामंडळाने या आदेशाची अंमलबजावणी केली नव्हती. त्यामुळे त्यांना व्यवहारांमध्ये काही प्रमाणात अडचणी येत होत्या. त्याशिवाय प्रवाशांनाही त्याचा फटका सहन करावा लागत होता. यासंदर्भात अनेक प्रवाशांनी महामंडळाची स्थानिक कार्यालये आणि मुख्य कार्यालयालाही तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन महामंडळाच्या वतीने ही “स्मार्ट कार्ड’ योजना सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या पुणे विभागाच्या विभागीय नियत्रंक यामिनी जोशी यांनी दिली.
ही आहेत आवश्यक कागदपत्रे
संपूर्ण जन्मतारीख असलेले आधारकार्ड
विद्यार्थ्यांसाठी आधारकार्डला लिंक असलेला पालकांचा मोबाइल क्रमांक
मतदान कार्ड किंवा पासपोर्ट
दिव्यांग व्यक्तीसाठी समाजकल्याण विभागाने दिलेले स्मार्ट कार्ड
असा मिळणार फायदा
शालेय विद्यार्थी, दिव्यांग व्यक्तींना लाभदायी.
आवश्यक रक्कम भरल्यास कार्डद्वारे प्रवास करणे शक्य होणार.
55 रुपयांमध्ये कार्डची वैधता पाच वर्षे.
नोंदणी केल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांमध्ये मिळणार कार्ड.
कार्डचे नूतनीकरण महाराष्ट्रात कोठेही करता येणार