अपघातग्रस्तांना एसटीने यंदा दिली 6 कोटींची मदत

पुणे – एस.टी. चालकांकडून अपघात घडतात. यात जखमी झालेल्यांना मदत (आर्थिक व वैद्यकीय) देण्यात येते. यामध्ये पुणे विभागाने संबंधित अपघातग्रस्तांना न्यायालयाच्या आदेशाने वर्षभरात 5 कोटी 92 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली आहे. तर, एस.टी महामंडळाने तत्कालिक आर्थिक वैद्यकीय मदतीपोटी 3 लाख 9 हजार 54 रुपये दिल्याची माहिती एस.टी प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांना दिलासाही मिळाला आहे.

एस.टी. चालकांकडून अपघात झाल्यानंतर सदर व्यक्तींना आर्थिक मदत करण्यात येते. यामध्ये अपघात झाल्यानंतर तत्काळ एक हजारांची आणि त्यानंतर संबंधित व्यक्तीला वैद्यकीय उपचारांसाठी 75 हजार ते लाखापर्यंत आर्थिक मदत देतात. तसेच अपघातातील व्यक्तींना प्राथमिक वैद्यकीय मदतीशिवाय गरज भासल्यास अपघात स्थळापासून जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया महामंडळाच्या वैद्यकीय नियमावलीत आहे, असे सांगण्यात आले.

या व्यक्तींना मिळते नुकसान भरपाई
एस.टी. अपघातात एखादा व्यक्ती जखमी अथवा मृत्यू पावल्यास न्यायालयीन प्रक्रिया सुरू होते. यामध्ये मृत व्यक्तीची पत्नी, विवाहित स्त्रीचा पती, अविवाहित मुलाचे वडील, मृताचा मोठा मुलगा अथवा अविवाहित ज्येष्ठ मुलगी यांनाच नुकसानभरपाई दिली जाते.

अपघातात मिळणारी नुकसान भरपाई (रुपयांत)
व्यक्तीचा मृत्यू- 10 लाख
प्रवाशाला कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास- 5 लाख
प्रवासी गंभीर जखमी – अडीच लाख
तात्पुरती दुखापत – 1 लाख

Leave A Reply

Your email address will not be published.