माळीण ते तळीये जगण्यासाठी संघर्ष

– रमेश जाधव

रांजणी -पुणे जिल्ह्यातील माळीण या गावानंतर महाड येथील तळीये गावावर दरडी कोसळून घडलेल्या दुर्घटनेमुळे डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या लोकवस्तीचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकणासह अनेक जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात जीवितहानीसह पशुधन, शेती, घरे यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोंगर उतारावरील गावे जास्त बाधित झाल्याचे चित्र आहे, त्यामुळे या गावांचा अस्तित्वाचा आणि पुनर्वसनाचा मुद्दा खऱ्या अर्थाने समोर आला आहे.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील भीमाशंकर, पोखरी घाट, आहुपे, खारे डिंभे, माळीण अशा अनेक डोंगर रांगातील आदिवासी गावांना पावसाळ्या दरम्यान भुस्खलन किंवा दरडी कोसळण्याच्या दुर्घटनेचा नेहमीच फटका बसतो.

अनेक लोक, पशु-पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागतो. अनेक जण जखमी होतात, तर अनेक जण कायमचे जायबंदी होतात. आयुष्य भराची कमाई क्षणार्धात पाण्यात जाते आणि ही कुटुंबे उद्‌ध्वस्त होतात.

विकासाच्या दृष्टीने मानवाने नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट करून निसर्गावर घाला घातल्यामुळे अशा मानव निर्मित घटना या आपत्तीला कारणी ठरत आहेत. डोंगर उतारावरील किंवा डोंगराच्या कुशीत वसलेली गावे आणि तेथील लोकांना पावसाळ्यादरम्यान जीवन मरणाशी संघर्ष करावा लागणारा संघर्ष हा भयावह आहे.

2014 साली घडलेल्या माळीण गावच्या दुर्घटनेपासून महाड येथील तळीयेची दरडी कोसळून घडलेली दुर्घटना याचा गांभीर्याने विचार करायला हवा. झाल्या प्रकाराची गंभीर दखल घेऊन सरकारला काही उपाययोजना किंवा प्रतिबंध घालावे लागतील.

डोंगरमाथ्यावर मानवी वर्दळ वाढली
डोंगर भागातून काढलेल्या रस्त्यांसाठी बुलडोझर लावून किंवा सुरूंग लावून डोंगराचे कडे कमकुवत झाले असतात आणि त्यामध्ये पावसाचे पाणी झिरपल्यामुळे असे डोंगर कपारीचे भाग निखळतात. मुरूम, माती किंवा दगड, खडी यासाठी अनेक ठिकाणी डोंगर पोखरले आहेत.

डोंगर माथ्यावर जमिनी काढल्या आहेत आणि त्यासाठी अनेक पाण्याची तळी बनवली आहेत त्यामुळे डोंगरकडांचे नुकसान होऊन अशा घटना घडतात.

डोंगरावरती मानवाची वर्दळ वाढल्यामुळे मानवाने याठिकाणी बंगले, रो-हाऊसेस, हॉटेल बांधल्यामुळे डोंगर-उताराचे आणि डोंगर कडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.