जिल्हा परिषदेत सभापतिपदी मानसिंगराव जगदाळे, मंगेश धुमाळ, सोनाली पोळ व कल्पना खाडे यांची वर्णी
सातारा – सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीप्रमाणेच सभापती निवडीतही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धक्कातंत्र दिसून आले. अपेक्षेप्रमाणे शिक्षण व अर्थ समिती सभापतिपदी ज्येष्ठ सदस्य मानसिंगराव जगदाळे व महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी कै. सदाशिवराव पोळ यांच्या स्नुषा सौ. सोनाली मनोजकुमार पोळ यांची बिनविरोध निवड झाली.
कृषी सभापतिपदी मात्र दिग्गजांचा पत्ता कट करत पिंपोडे बुद्रुक गटातील मंगेश धुमाळ यांची तर समाजकल्याण सभापतिपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अर्जुनराव खाडे यांच्या स्नुषा कल्पना विजय खाडे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीत माण- खटाव मतदारसंघात दोन सभापतिपदे, फलटण – कोरेगाव, कराड मतदारसंघात प्रत्येकी एक सभापतिपद देण्यात आले. या निवडीत पाटण आणि सातारा- जावळी मतदारसंघाला डावलण्यात आल्याने पक्षातील नाराजी चव्हाट्यावर आली.
जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांची जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर गुरुवारी सकाळी बैठक झाली. या बैठकीस विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आ. दीपक चव्हाण, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, विद्यमान अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, सत्यजितसिंह पाटणकर, जिल्हा बॅंकेचे संचालक अर्जुनराव खाडे, राजेश पवार, मनोज पवार, शिवाजी सर्वगौड, वनिता गोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सभापती निवडीत फलटण- कोरेगाव, पाटण, सातारा- जावळी, माण- खटाव, कराड या विधानसभा मतदारसंघात संधी मिळेल, अशी अपेक्षा होती.
त्यानुसार शिक्षण सभापतिपदासाठी राजेश पवार पुन्हा इच्छुक होते. कृषी सभापतिपदासाठी धैर्यशील अनपट आणि मंगेश धुमाळ, महिला व बालकल्याण सभापतिपदासाठी सौ. सोनाली पोळ व डॉ. सौ. भारती पोळ, समाजकल्याण सभापतिपदासाठी पाटणचे बापूराव जाधव आणि मधू कांबळे इच्छुक होते. ना. रामराजे यांनी सदस्यांची मते जाणून घेतली. पदे चार असून इच्छुक अनेक असल्याने कोणीही नाराज होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीप्रमाणे सभापतिपदाच्या निवडीसाठीही ऐनवेळी पक्षश्रेष्ठींचा रामराजेंना फोन आला. त्यानुसार मानसिंगराव जगदाळे, मंगेश धुमाळ, सौ. सोनाली पोळ व अनपेक्षितपणे एनकूळच्या सौ. कल्पना खाडे यांची
नावे जाहीर करण्यात आली.
समाजकल्याण सभापतिपद ऐनवेळी पाटणवरुन माण – खटाव मतदारसंघात गेल्याने विक्रमसिंह पाटणकर अध्यक्ष बंगल्यावरुन निघून गेले. पाटण मतदारसंघात सभापतिपद न मिळाल्याने त्यांची नाराजी उघड झाली. सातारा- जावळीतही सभापतिपद न मिळाल्याने सदस्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली नसली तरी नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.
सभापतिपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने प्रत्येक एकच अर्ज दाखल करण्यात आला तर पाटण विकास आघाडीचे विजय पवार, सुग्रा बशीर खोंदू, मंगल गलांडे, शंकर खबाले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक बिनविरोध होणार की मतदान होणार याची उत्सुकता लागली होती. दुपारी पीठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली.
यावेळी आठही उमेदवारांच्या अर्ज छानणीत वैध ठरले. संजीवराजे नाईक निंबाळकर आणि उदय कबुले यांनी विरोधी सदस्यांना अर्ज मागे घेवून निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले. त्यानुसार चारही अर्ज माघारी घेतल्याने सभापती निवडी बिनविरोध झाल्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
विक्रमसिंह पाटणकरांची नाराजी
पाटण तालुक्यात राष्ट्रवादीकडे आमदारकी नसल्याने तालुक्यातील राजेश पवार यांना पुन्हा शिक्षण सभापतिपद द्यावे, अशी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांची मागणी होती. समाजकल्याण पदासाठी बापूराव जाधव यांना संधी देऊन पक्ष वाढीस वाव द्यावा, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, राजेश पवार आणि बापूराव जाधव यापैकी कोणालाही सभापतिपद मिळत नसल्याने पाटणकर यांनी नाराजी व्यक्त केली. ना. रामराजे यांनी बोलावूनही पाटणकर यांना त्यांच्यासमोर जाणे टाळून ते तिथून निघून गेले.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सदस्य मानसिंगराव जगदाळे तिसऱ्यांदा मसूर जिल्हा परिषद गटातून निवडून आले आहेत. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी सरपंचपद भुषवले होते. सुमारे 40 वर्षांहून अधिक काळ ते राजकारणात असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्याशी ते कायम एकनिष्ठ राहिले आहेत. मात्र, सलग दोन वेळा अध्यक्षपदाच्या निवडीत जगदाळे यांची संधी हुकली होती. सभापतिपदही जगदाळे घेणार नसल्याची चर्चा होती. मात्र, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर जगदाळे यांनी शिक्षण व अर्थ समितीचे सभापतिपद स्वीकारण्यास संमती दिली. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसने जगदाळे यांच्या ज्येष्ठत्वाचा सन्मान राखला.