संदीप राक्षे
शिवेंद्रसिंहराजे भोसले-दीपक पवार यांच्यात प्रतिष्ठेची लढत
सातारचे राजघराणे, विशेषत: माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि दीपक पवार यांच्यातील संघर्ष सातारकरांना काही नवीन नाही. त्यामुळे राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेले शिवेंद्रराजे भोसले आणि भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेले दीपक पवार यांच्यात सातारा-जावळी मतदारसंघातील संभाव्य लढत प्रतिष्ठेची बनली आहे. या मतदारसंघात सत्तासंघर्ष पेटला असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादीत असताना मतदारसंघाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. गेल्या निवडणुकीत त्यांच्याविरोधात भाजपकडून लढलेल्या दीपक पवार यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून मतदारसंघात अनेक विकासकामे मार्गी लावली. दीपक पवार यांचा मागील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी त्यांना पुढच्या निवडणुकीची तयारी करायला सांगितले होते. त्यानंतर दीपक पवार व त्यांच्या समर्थकांनी मतदारसंघ पिंजून काढून भाजपचे जाळे निर्माण केले.
388 बूथप्रमुखांची नियुक्ती करून पक्ष संघटना वाढवली. विधानसभा निवडणूक जवळ येत असताना भाजपने दीपक पवार यांना पश्चिम महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद दिले. या पदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहे. मात्र, थोड्याच दिवसात साताऱ्यातील राजकारणाला जबरदस्त कलाटणी मिळाली. लोकसभा निवडणुकीपर्यंत उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील संघर्ष राष्ट्रवादीला थोपवता न आल्याने शिवेंद्रराजे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजप प्रवेशामुळे शिवेंद्रराजेंची ताकद आणखी वाढली. मात्र, भाजपमध्ये उमेदवारीवरुन त्यांना दीपक पवार यांनी विरोध केला. दीपक पवारांनी साताऱ्यात मेळावा घेऊन “शिवेंद्रराजे हटाव, भाजप बचाव’ असा नारा दिला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रा साताऱ्यात आल्यावर फासे फिरले. मुख्यमंत्र्यांनी शिवेंद्रराजेंच्या उमेदवारीची घोषणा करून त्यांना मदत करण्याची सूचना दीपक पवार यांना केली. त्यामुळे संघर्षात आणखी भर पडली.
ज्यांच्याविरोधात पाच वर्षे काम केले, त्यांना मदत कशी करायची? कार्यकर्ते काय म्हणतील, याचा विचार करुन दीपक पवार यांनी भाजपला रामराम ठोकला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत साताऱ्यात झालेल्या मेळाव्यात दीपक पवारांनी पक्षात प्रवेश केला. साहेब तुम्हीच मला आमदार करू शकता, असे म्हणत त्यांनी शिवेंद्रराजेंवर सडकून टीका केली. एकाच घरात 45 वर्षे सत्ता असतानाही त्यांनी जिल्ह्याचा विकास न केल्याचा आरोपही पवार यांनी केला. शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दीपक पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करताना, सातारा-जावळीत परिवर्तन घडवण्याचे आवाहन केले.
शिवेंद्रराजेंच्या विरोधात राष्ट्रवादीने दीपक पवार यांचा पर्याय उभा केला आहे. त्यांच्याविरोधात दीपक पवारच बोलू शकतात, असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटत आहे. राष्ट्रवादीचे कोरेगावातील आमदार शशिकांत शिंदे यांचा जावळी तालुक्यात व्यापक जनसंपर्क आहे. त्यामुळे त्यांची कणखर साथ दीपक पवार यांना लाभेल. वडील साहेबराव पवार, बंधू सुधीर पवार यांचाही मतदारसंघात जनसंपर्क आहे. त्याचाही फायदा दीपक पवार यांना होण्याची शक्यता आहे. एकंदर शिवेंद्रराजे भोसले व दीपक पवार यांच्यात “कॉंटे की टक्कर’ होणार असल्याचे चित्र सध्या आहे. दोन्ही बाजूंकडून मेळावे, भेटीगाठी, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील लढतीची साऱ्यांनाच उत्सुकता आहे.
दोघांचाही दांडगा जनसंपर्क
शिवेंद्रसिंहराजे भोसले हे शांत, संयमी नेते म्हणून ओळखले जातात. राजकारणात टीकेच्या मर्यादा ते काही अंशी तरी पाळतात. त्यांच्याकडे बघण्याचा जनतेचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यांचा मतदारसंघातील जनसंपर्क दांडगा आहे. दीपक पवारही टीकाटिप्पणी करताना मर्यादा पाळतातात. त्यांनीही गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात जनसंपर्क वाढवला आहे.
लढाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
शिवेंद्रराजे भाजपमध्ये गेल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. येथे राष्ट्रवादीचाच आमदार होईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीच्या नुकत्याच झालेल्या मेळाव्यात शरद पवार यांनी दोन्ही राजांवर सडकून टीका केली होती. दुसरीकडे भाजप सोडणाऱ्या दीपक पवार यांना पाडण्यासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते पेटून उठले आहेत. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.