5 हजार 653 जागांसाठी 27 हजारांवर अर्ज
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारात असलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एकूण 27 हजार 787 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात प्रवेशाची क्षमता 5 हजार 653 इतकी आहे. त्यामुळे विद्यापीठातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेची अभ्यासपूर्वक तयारी करावी लागणार आहे.
विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमासह अनेक पदवी व पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा समावेश आहे. त्यासाठी दि.10 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. पदवी व पदव्युत्तरची प्रवेश क्षमता 3 हजार 353 इतकी आहे. त्यासाठी अर्जाची संख्या 22 हजार 467 इतकी आहे.
आता पदवी व पदव्युत्तरसाठी प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाते. त्यानंतर प्रवेश दिले जाणार आहे. दरम्यान, बॅचलर ऑफ व्होकेशनल (बी.व्होक), बीए लिबरल आर्टस, संगीत, नृत्य, नाटक यासह अन्य पदवी अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठातर्फे येत्या 16 ऑगस्ट रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा विद्यार्थ्यांना ऑनलाइन देता येणार आहे.