मॉन्सूनच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क
पुणे – पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्ह्यातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे काम सुरू केले. यामुळे पुलांच्या मजबुतीची माहिती समोर येणार आहे. महाडमधील सावित्री नदीवरील पूल महापुरात वाहून गेल्याची दुर्घटना अडीच वर्षांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर धोकादायक बनलेल्या पुलांची वस्तुस्थिती समोर आली होती. या घटनेनंतर शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित सर्व पुलांची तातडीने तपासणी करून आवश्यकतेनुसार स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे आदेश दिले होते. जूनपासून मान्सूनचे आगमन होण्यास सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यात एकूण 68 पूल आहेत. त्यापैकी आठ पूल धोकादायक असल्याचे निदर्शनास आले होते. हे सर्व पूल ब्रिटिशकालीन आहेत. पुलाच्या बांधकामांची मुदत उलटून वीस ते पंचवीस वर्ष झाली आहेत. पावसामुळे हे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येतात. त्यानंतर यातील सहा पूल पुन्हा सुरू करण्यात येतात. लवकर हे पूल तपासणीचे काम सुरू पूर्ण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या तपासणीच्या अहवालानंतर धोकादायक किंवा दुरुस्ती करणे आवश्यक असलेल्या पुलांची माहिती समोर येणार आहे.