पुणे विद्यापीठांतील इमारतींचे स्ट्रक्‍चरल ऑडिट, विमा उतरविणार

सकारात्मक विचार करण्याबद्दल कुलगुरूंनी दिला विश्‍वास

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात असणाऱ्या इमारतींचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यासोबतच त्यांचा विमा उतरविण्याचा सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी अधिसभेत दिली.

अधिसभा सदस्य गिरीश भवाळकर यांनी मुख्य इमारतीसह सर्व इमारतीचे स्ट्रक्‍चरल ऑडिट आणि विम्याबाबत प्रश्‍न उपस्थित केला होता. 30 वर्षांपूर्वीच्या सर्व इमारतींचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात आले आहे. मात्र, त्यावर इमारतीचाविमा उतरविण्यात आला नसल्याचे विजय सोनवणे यांनी सांगितले. त्यावर भवाळकर यांनी इमारतीइतकीच विमाही सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या चर्चनंतर कुलगुरू डॉ. करमळकर यांनी इमारतीचे स्ट्रक्‍चरल ऑडिट व त्याचा विमा उतरविण्याबाबत विद्यापीठ सकारात्मक असल्याचे नमूद केले.

कॅगचा कृती अहवाल पुढच्या अधिसभेत
विद्यापीठाच्या 2012 ते 2016 या आर्थिक वर्षांच्या लेखापरीक्षण अहवालावर “कॅग’ने ताशेरे ओढले होते. त्याबाबतचा स्थगन प्रस्ताव अधिसभा सदस्य शामकांत देशमुख यांनी उपस्थित केला. संबंधितावर कारवाई व्हावी, अशी मागणी प्रस्तावाद्वारे केली. त्यानंतर “कॅग’च्या संदर्भात निरीक्षण अहवाल आणि कृती अहवालाबाबत पुढच्या सिनेटमध्ये चर्चा करण्यात येईल, असे वित्त व लेखाधिकारी अतुल पाटणकर यांनी स्पष्ट केले. या आश्‍वासनानंतर हा प्रस्ताव मागे घेण्यात आला.

इंग्रजी विभागाची नियुक्‍त नियमांनुसारच
इंग्रजी विभागातील प्राध्यापकांच्या नियुक्‍तीवरून अधिसभा सदस्य संतोष ढोरे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. त्यावर वाद-प्रतिवाद झाल्यानंतर प्राध्यापक नियुक्‍तीत कोणताही गैरप्रकार झाला नसून, या संदर्भातील सर्व कागदपत्रे कोणालाही पाहता येतील, असे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी समिती नेमण्याची मागणी सदस्यांनी केली. मात्र समिती नेमल्यास निवड समितीवर अविश्‍वास दाखविल्यासारखे होईल, असे सांगत या विषयावर पडदा पडला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.