जपानच्या होक्काइडो या उत्तरेकडील मुख्य बेटावर भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी मोजण्यात आली आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे आणि जपान मेटोलॉजिकल एजन्सीने याबाबत माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. जपानमधील कुशिरो आणि नेमुरो या शहरांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.
स्थानिक वेळेनुसार रात्री 10.27 वाजता भूकंप झाल्याचे USGS ने सांगितले. या भूकंपाची तीव्रता 6.1 एवढी होती. एजन्सीने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू प्रशांत महासागरातील कुशिरोपासून 60 किलोमीटर अंतरावर होता. ईशान्य जपान आणि पूर्व जपानसह इतर भागातही भूकंपाचे धक्के जाणवले.
भूकंपामुळे लोकांमध्ये एकच खळबळ उडाली असून ते घराबाहेर पडले. एजन्सीने सांगितले की, सध्या कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. तज्ज्ञांनी लोकांना आठवडाभर सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. यापूर्वी २० फेब्रुवारीला जपानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. जरी त्याची तीव्रता आजच्या तुलनेत कमी होती. त्यावेळी भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.5 एवढी होती. टोकाची प्रदेशातील एकमेव शहर असलेल्या ओबिहिरोच्या पश्चिमेला 9 किलोमीटर आणि कुशिरोच्या नैऋत्येला 104 किलोमीटर अंतरावर जमीन हादरली.
तुर्कीमध्ये पुन्हा पृथ्वी हादरली
दुसरीकडे, तुर्कीमध्ये शनिवारी (25 फेब्रुवारी) पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.5 इतकी मोजली गेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू 10 किमी खोलीवर होता. 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या भूकंपाच्या 3 धक्क्यांमध्ये सुमारे 48,000 लोक मरण पावले.
पाकिस्तानात भूकंपाचे धक्के
दुसरीकडे, 24 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी सहा वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.9 इतकी मोजण्यात आली. स्थानिक मीडियानुसार या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.