पुणे – सरकार स्थापनेबाबत पेच अद्यापही कायम असून मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेचे शुक्रवारी ठरल्याऐवजी बिनसल्याचे चित्र दिसून आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळी पत्रकार परिषद घेत एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. अशातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचे एकाच फ्लेक्सवर फोटो लावण्यात आले होते. यामुळे, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस भाजपला सत्ताच्यूत करण्यासाठी शिवसेनेला सहकार्य करण्याची योजना आखत असल्याची चर्चा रंगली आहे.
पुण्यातील कोंढवा परिसरात एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो असलेला फ्लेक्स लावण्यात आला आहे. त्यावर महाराष्ट्राच्या जनतेने, महाराष्ट्रातील पावरबाज जनतेने, संघर्षातील आदेश स्वीकारला आहे…! बळीराजाच्या मनातील अन हातातील घड्याळाच्या अचूक वेळेने, धनुष्यबाणातील अचूक वेधाने जनता राजा स्वीकारावा…! असा मजकूर फ्लेक्सवर लिहला आहे. यामुळे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन नवीन समीकरण उदयास येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.