महाबळेश्वर – ग्रामीण भागातून करोनाचे रूग्ण आढळून येत असल्याने महाबळेश्वर बंद ठेवायचे का? याबाबत निर्णय घेण्यासाठी आयोजित केलेली बैठक दोन गटातील कुंभारदरे बंधुंच्या शाब्दिक खडाजंगीने चांगलीच गाजली. दरम्यान, वाद मिटण्याची चिन्हे दिसत नसल्याने अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून ही बैठकच बंद पाडली. शिवसेनेचे राजेश कुंभारदरे यांनी बंदला विरोध केला तर भाजपचे रवींद्र कुंभारदरे हे बंद साठी आग्रही होते. दरम्यान बुधवारी महाबळेश्वर चालू राहणार की बंद राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे
पाचगणी पाठोपाठ महाबळेश्वर तालुक्याच्या पश्चिम भागातील कासरूंड येथे करोनाचे दोन रूग्ण आढळुन आले. पाचगणीमध्ये करोनामुळे निधन झालेल्या महिलेच्या घरातील दोन व्यक्तींना करोनाची लागण झाल्याने महाबळेश्वर शहरात एकच खळबळ माजली. करोनाच्या भीतीने अनेक गावांनी कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला असाच निर्णय महाबळेश्वर शहराने घ्यावा यासाठी आज पोलीस ठाण्याच्या शेजारीच एका औपचारीक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला काही ठराविक मान्यवरांनाच तोंडी निरोप देवून बोलविण्यात आले होते. परंतु या बैठकीला मान्यवरांबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. मुंबईवरून आलेल्या चाकरमानी यांची शहरात वर्दळ दिसते याबाबत प्रारंभी भाजपचे नगरसेवक रवींद्र कुंभारदरे यांनी चिंता व्यक्त करुन काही दिवस बाजारपेठ कडकडीत बंद करण्यात यावी अशा सुचना करून निर्णय घ्यावा असे सांगितले.
रवींद्र कुंभारदरे यांच्या सुचनेला प्रभाकर कुंभारदरे यांनी दुजोरा दिला व असा निर्णय घेण्यात आला तर किराणा व्यापारी या निर्णयाचे स्वागत करतील अशी भूमिका मांडली. याला शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे यांनी दुकानाच्या वेळा बदला, दुकाने उघडण्याचा कालावधी कमी करा, पण बाजारपेठ सलग बंद करता येणार नाही, अशी भूमिका मांडली.
त्यामुळे व्यापारी संतप्त झाले आणि बैठकीत शाब्दिक खडाजंगी सुरू झाली, या खडाजंगीमध्ये दोन्ही बाजुंनी व्यापारी प्रतिनिधिंनी भाग घेतल्याने बैठकीतील वातावरण तापले. राष्ट्रवादी कॉंग्रसचे अनेक नगरसेवकही खडाजंगी केवळ पहात होते. या बैठकीतील गोंधळ वाढू लागल्याने पोलिसांना हस्तक्षेप करणे भाग पडले पोलिसांनी बैठकीसाठी आलेल्या लोकांना जागा खाली करण्याच्या सूचना करून सर्वांना पांगविले काही वेळाने माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांच्यासह प्रमुख मंडळी हॉटेल सनी इंटरनॅशनल येथे जमा झाले व तेथे तासभर चर्चा केली. परंतु या चर्चेतही दोन्ही कुंभारदरे बंधु यांनी आपली भूमिका सोडली नाही. त्यामुळे सायंकाळपर्यंत कोणताही निर्णय झाला नाही, त्यामुळे उद्या महाबळेश्व बंद राहणार की सुरू राहणार? याबाबत संभ्रमाचे वातावरण असून उद्या काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागुन राहिले आहे.