पश्‍चिम बंगालच्या मावळत्या राज्यपालांचे ममतांवर जोरदार टीकास्त्र

भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा आणि संयम बाळगण्याचा दिला सल्ला

कोलकता -पश्‍चिम बंगालचे मावळते राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी शनिवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ममतांच्या लांगूलचालनाच्या धोरणामुळे राज्यातील सामाजिक सलोख्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटले. त्याशिवाय, भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्लाही त्यांनी ममतांना दिला.

पश्‍चिम बंगालचे नवे राज्यपाल जगदीप धनकर 30 जुलैला पदभार स्वीकारणार आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर, राज्यपालपदाचा कार्यकाळ समाप्त होत असलेल्या त्रिपाठी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला व्यापक मुलाखत दिली. त्यात त्यांनी ममतांवर शाब्दिक तोफ डागली. ममतांकडे दूरदृष्टी आहे. घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार त्यांना आहे. मात्र, त्या काही वेळा भावनिक होतात. त्यावर त्यांनी नियंत्रण ठेवायला हवे. त्यांनी संयम बाळगायला हवा. भेदभाव न करता प्रत्येक नागरिकाबाबत त्यांनी समान भावना ठेवायला हवी, असे ते म्हणाले.

पश्‍चिम बंगालमधील राजकीय हिंसाचार चर्चेचा विषय बनला आहे. त्याबाबत त्रिपाठी यांनी चिंता व्यक्त केली. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थितीत मोठी सुधारणा होण्याची गरज आहे, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली. चिंताजनक कायदा आणि सुव्यवस्था स्थितीमुळे पश्‍चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे अगत्याचे वाटते का, या प्रश्‍नावर थेट उत्तर देण्याचे त्रिपाठी यांनी टाळले. पश्‍चिम बंगालमधील निवडणुका मुक्त आणि न्याय्य वातावरणात झाल्या नसल्याच्या अनेक तक्रारी आपल्याकडे आल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. त्रिपाठी यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांचा अनेकदा ममतांशी शाब्दिक संघर्ष झाल्याचे पाहावयास मिळाले. मोदी सरकारच्या निर्देशावरून त्रिपाठी राज्य सरकारच्या कामकाजात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप ममतांनी सातत्याने केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)