नगर शहरात पावसाची जोरदार हजेरी

गटारी तुंबल्याने अनेकांच्या घरात शिरले पाणी : हवामानखात्याकडून सोमवारी मुसळधार पावसाचा अंदाज

नगर – नगर शहरासह जिल्ह्यात अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सुकूलागलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवीत झाल्या आहेत. मागील एक महिन्यापासून जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे पिण्याच्या पाणी योजना ही आडचणीत आल्या होत्या. मात्र, या पावसाने काहीसा दिलासा मिळणार आहे. शहरातही आज दीड तास झालेल्या जोरदार पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. अनेक ठिकाणी व्यावसायीक गाळ्यांतही पाणी शिरले होते. येत्या तीन दिवसांत जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान खात्यानं वर्तविली असून, कालपासून जिल्ह्यात पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे.

आज नगर जिल्ह्यासह नाशिक, पुणे, नंदूरबार, धुळे या जिल्ह्यांतही मुसळधार पावसाची शक्‍यता हवामानखात्याने वर्तवली आहे. रविवारीही पावसाचा जोर कायम राहणार आहे. सोमवारी नगर जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहणार आहे. येत्या तीन दिवसांमध्ये जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार असल्याने जिल्हा प्रशासन विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे. शनिवार सकाळपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे.

नगर तालुक्‍यातील शिराढोण, मांजरसुंबा, शेंडी, जेऊर, बुऱ्हाणनगर, नागरदेवळे, भिंगार, बाराबाभळी, एमआयडीसी या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. मागील महिन्यापासून चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणारा शेतकरी शुक्रवारी जिल्ह्यात झालेल्या पावसाने अखेर काहीसा सुखावला. अखेरच्या घटका मोजणाऱ्या खरीप पिकांना या पावसामुळे संजीवनी मिळाली आहे. संगमनेर, अकोले, नगर तालुका, श्रीगोंदा, शेवगाव, श्रीरामपूर तसेच जामखेड तालुक्‍यांत पावसाने हजेरी लावली. गेल्या महिनाभरापूर्वी काही ठिकणी कमी-अधिक झालेल्या पावसावर जिल्हाभर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. परंतु गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने ही पिके जळू लागल्याने शेतकरी अस्वस्थ झाला होता.

दुष्काळी परिस्थितीचा प्रदीर्घ सामना केल्यानंतर जिल्ह्यात काही भागात जोरदार तर काही ठिकाणी जेमतेम पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांकडून खरिपाची पेरणी म्हणावी अशी झाली नाही. कृषी विभागाने यंदा चार लाख 78 हजार 638 हेक्‍टर क्षेत्राचे नियोजन खरीप हंगामासाठी केले आहे. परंतु ते उद्दिष्ट पावसा अभावी गाठता आले नाही. यंदा वेळेत पाऊस न झाल्याने मुगाच्या पेरण्यांचा मोसम निघून गेला. त्यामुळे मुगाच्या पेरणीत चांगली घट झाली. गेल्यावर्षी जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याने खरिपापाठोपाठ रब्बी हंगाम देखील वाया गेला होता. गेल्यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अतिशय कमी पावसाची नोंद झाली होती. 63 टक्‍के पाऊस पडल्याने ऑक्‍टोबर महिन्यापासून जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली. त्यानंतर मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात पाणी व चारा टंचाई तोंड देत आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर परिस्थती बदलेल, असे वाटले होते. पण हा महिना देखील कोरडा गेला. 22 जूनपासून पावसाला सुरूवात झाली. मात्र समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या कमी झाल्या. नगर शहर व उपनगराच्या परिसरात झालेल्या संततधार पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. रिमझिम पावसामुळे शहरांतर्गत रस्त्यावर चिडचिड झाली होती. वाहनचालकांना गाडी चालवताना कसरत करावी लागत होती. गाडी घसरून अपघात होण्याचा धोका असल्याने वाहतूक संथगतीने सुरू होती. त्यामुळे बहुतांश रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होती. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात येत्या दोन दिवसांत ठिकठिकाणी पाऊस होणार असल्याचा इशारा दिला आहे.

पावसाने महापालिकेचा कारभार पाडला उघड्यावर
जिल्हा प्रशासनाच्या वतीने महानगरपालिकेला मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापनेचे आदेश दिले होते. त्यानुसार महानगरपालिकेने नालेसफाई केल्याचे दाखविण्यात आले होते. परंतु शनिवारी झालेल्या पावसाने महापालिकेचा कारभार उघड्यावर पाडला आहे. शहरात सर्वत्रच नाले तुंबल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले. तसेच पुलाच्या नळ्यात कचरा अडकल्याने सिना नदी वरील पुलावरून पाणी वाहते झाले. त्यामुळे मालिकेच्या कामकाजात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

बेसमेंटचे गाळे पाण्याने भरले
शहरासह उपनगरात जोरदार पावसाने हजेरी लावाली. त्यामुळे गुलमोहर रस्त्यावरील पारिजात चौकातील कोहिनुर मंगलकार्यालयाजवळील असलेले गाळे पावसाच्या पाण्याने गाळे आर्धे भरले. त्यामुळे गाळे मालकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे.

महापालिकेने नुकसान भरपाई द्यावी
कैलास वसाहतीत पाणी शिरल्याने तेथील नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वास्तविक पाहाता या नाल्यातून पाण्याचा निचरा व्हावयास हवा होता. मात्र पाईपलाईन केल्याने त्यात अर्धाअधीक गाळ भरल्याने पाणी नागरिकांच्या घरात शिरले. मनपाच्या दुर्लक्षामुळे हे घडले असल्याने मनपाने तातडीने येथील नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या वसाहतीतल्या नागरिकांनी केली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.