देशातील तपास यंत्रणा भाजपच्या विजयाचे मजबूत आधारस्तंभ

खासदार संजय राऊत यांचा सरकारवर निशाणा

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जाहीर पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता भाजपवर निशाणा साधला आहे. सीबीआय, ईडीसारख्या देशातील तपास यंत्रणा या भाजपच्या विजयाचे मजबूत आधारस्तंभ असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातून त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्र सहकारी बॅंक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार यांच्या बाजूने वक्तव्य केल्यानंतर राऊत यांनी महाराष्ट्र हा सुडाच्या राजकारणाचा बळी असल्याचे म्हटले. महाराष्ट्रातील निवडणूक ही निर्विवाद आणि एकतर्फी होत असताना शिखर बॅंकेतील घोटाळ्यात शरद पवार यांचे नाव आणून राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठे करण्यात आले आहे. पवारांवरील ईडीच्या कृतीने ग्रामीण भागातील वातावरण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बाजून झुकले आहे, असे ते म्हणाले. सीबीआय आणि ईडी हे भाजपच्या विजयाचे दोन मजबूत आधारस्तंभ आहे, आणि आता या स्पर्धेत निवडणूक आयोगानेही उडी घेतली आहे. निवडणूक आयोगाचे आयुक्त अशोक लवासा यांच्या पत्नीच्या मागे प्राप्तीकर विभागाच्या चौकशीचा ससेमिरा लावल्याचे उदाहरण राऊत यांनी आपल्या लेखात दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.