हडपसर(प्रतिनिधी) :- हडपसर मतदारसंघात पुणे मनपाने प्राण्यांच्या दवाखान्याचा प्रकल्प सुरू करण्याचे मंजूर केले आहे. रामटेकडी येथील औद्योगिक वसाहत येथे कचरा प्रकल्पाच्या शेजारीच हा प्रकल्प सुरू करण्याचा घाट घातला जातो आहे. तीन-तीन कचरा प्रकल्पामुळे आधीच हैराण झालेल्या हडपसरवासीयांच्या माथी आता हा प्राण्यांचा दवाखाना मारला जातो आहे. मुळातच ही जागा चुकीची असून यामुळे प्राण्यांचे आरोग्य धोक्यात येणार आयुक्तांनी ही जागा बदलावी अशी मागणी करत माजी नगरसेवक योगेश ससाणे यांनी प्रत्यक्ष जागेवर जावून केली.
योगेश ससाणे म्हणाले की, प्राण्यांच्या दवाखान्याला आमचा विरोध नाही. मात्र, तो आमच्याच माथी का ? आधीच येथील कचरा प्रकल्पांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. वारंवार मागणी करुनही आवश्यक असणारे रुग्णालय दिले जात नाही. सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात येते आहे.
रामटेकडी भागात पर्यायाने हडपसरमध्ये सातत्याने कचरा प्रकल्प लादले जात आहेत. त्यात आता ज्या जागेवर प्राण्यांच्या उपचारासाठी दवाखाना उभारण्यात येणार आहे. ती जागा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय धोक्याची ठरणारी आहे. या जागेपेक्षा आयुक्तांनी शहरातील इतर भागात असलेल्या अमेनेटिज स्पेसवर हा प्रकल्प राबवावा, असेही यावेळी योगेश ससाणे यांनी सांगितले.