मनिला – फिलीपाईन्सच्या उत्तरेकडील भागाला आज भूकंपाचा जोरदार धक्का बसला. त्यामध्ये किमान चार जणांचा मृत्यू झाला. तर डझनभर लोक जखमी झाले आहेत. राजधानी मनिलामध्ये रुग्णालयांमध्ये या भूकंपामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि तेथील रुग्णांनाही रुग्णालयाच्या बाहेर हलवण्यात आले. या भूकंपाची तीव्रता 7 इतकी होती आणि भूकंपाचा केंद्रबिंदू अब्रा प्रांतात जमिनीखाली 17 किलोमीटरवर होता, असे “फिलीपाईन इन्स्टिट्युट ऑफ व्हल्कॅनोलॉजी ऍन्ड सिस्मोलॉजी’च्या प्रमुखांनी सांगितले.
आज सकाळी जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता एवढी भयानक होती, की त्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठादेखील खंडीत झाला. काही गावांमध्ये भूकंपामुळे भिंती पडल्या. त्यामुळे चार जण ठार झाल्याचे वृत्त आहे. बांधकाम सुरू असलेली एक इमारत पूर्ण जमिनदोस्त झाली आहे.
अब्रा प्रांतात अनेक घरांना आणि इमारतींना तडे गेले आहेत. भूकंपामुळे सर्वाधिक हानी याच प्रांतात झाली आहे. अध्यक्ष फर्डिनांड मार्को ज्युनिअर यांनी या भागाची पहाणी करण्यासाठी दौरा निश्चित केला आहे. भूकंपाचे अनेक धक्के नंतर काही वेळाने जाणवत राहिले होते. मात्र त्यांची तीव्रता पहिल्या धक्क्याइतकी जास्त नव्हती. या “आफ्टरशॉक’मुळे आणखीन नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.
फिलीपाईन्समध्ये 1990 साली 7.7 क्षमतेचा भूकंप झाला होता. त्यामध्ये 2 हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. भूकंपाव्यतिरिक्त सुमारे 20 चक्रिवादळांचा फटका फिलीपाईन्सला बसतो.