- आयुक्तपदी पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची वर्णी लागण्याची शक्यता
- रुबल अगरवाल यांच्या नावाला प्राधान्य
पिंपरी – तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण केल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या बदलीच्या जोरदार चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. त्यातच करोनाचे दिवसेंदिवस वाढणारे रुग्ण, करोनाच्या आडून सुरू असलेली खरेदी यामुळे त्यांच्याबाबत निर्माण झालेले संशयास्पद वातावरण यामुळे अजित पवारही त्यांच्यावर नाराज झाल्याची चर्चा आहे. भाजपाच्या नेत्यांचे हितसंबंध जपण्यातच अधिक वेळ गेल्यामुळे त्यांची उचलबांगडी होण्याची शक्यता असून, त्यांच्या जागी पुण्याच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सध्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपल्यामुळे नवे आयुक्त कोण येणार याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अर्थातच महापालिकेवर भाजपची सत्ता असल्याने येणारे आयुक्त आपल्या मर्जीतले असावेत यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जोरदार “फिल्डिंग’ लावून सध्या, विदर्भ आणि कोकणात कार्यरत असलेल्या दोन अधिकाऱ्यांची नावे येथील कारभाऱ्यांनी सुचविल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, राज्याच्या राजकारणाची सूत्र महाआघाडीच्या हातात गेल्यानंतर व पुण्याचे पालकमंत्री पद स्वीकारणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नव्या आयुक्तांची स्वतः निवड करण्याचे ठरवून येथील सत्ताधाऱ्यांच्या मनसुब्यांवर पाणी फिरविण्याची तयारी केली आहे.
त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्या पुणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या आणि प्रशासकीय सेवेचा प्रगल्भ अनुभव असणाऱ्या रुबल अगरवाल यांच्या नावाला प्राधान्य दिल्याचे सूत्रांनी सांगितले. रुबल अग्रवाल यांनी “बेटी बचाव बेटी पढावं’ अभियान प्रभावीपणे राबविल्यामुळे शासनाकडून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. जळगाव, शिर्डी संस्थानवर काम करताना त्यांनी आपली छाप सोडली होती. तर सध्या पुण्यातील करोनाची परिस्थिती सक्षमपणे हातळत असल्याने प्रशासनावर त्यांची मजबूत पकड असल्याचे मानले जाते. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आहे. सत्तेच्या माध्यमातून अनागोंदी कारभार सुरू असून, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर अधिकाऱ्याची मागणी वारंवार स्थानिक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्याकडे केली होती.
तर दुसरीकडे रुबल यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. शिवाय त्यांचा अनुभव, अभ्यास, आणि त्यांच्याकडून अडचणींवर मात करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनाचे “प्रेझेंटेशन’ने प्रभावी होऊन त्यांना पिंपरी-चिंचवड शहराच्या आयुक्तपदी आणण्यासाठी “अजितदादा’ आग्रही असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळासह पालिकेत रंगली आहे.
रुबल अगरवाल यांच्याबद्दल थाेडक्यात
- मूळच्या राजस्थानच्या रहिवासी
- 2008 बॅचच्या अधिकारी
- अकोला उपजिल्हाधिकारी, जळगाव जिल्हाधिकारी, शिर्डी संस्थान सीईओ
- मुंबई, मराठवाडा विभागात प्रशासकीय कामाचा प्रगल्भ अनुभव
- सध्या पुणे स्मार्ट सिटी योजनेच्या अध्यक्षपदी
- पुण्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष नियोजन करण्याची मुख्य जबाबदारी