राजस्थानसमोर बलाढ्य दिल्लीचे आव्हान

मुंबई  -संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स व ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज होणारा सामना एकतर्फी होण्याचीच शक्‍यता जास्त आहे. राजस्थानचा संघ दिल्लीसमोर अत्यंत कमकुवत दिसत आहे.

सॅमसनकडे संघाचे नेतृत्व यंदा सोपवण्यात आले असले तरीही संघात दिल्लीसारखे तुल्यबळ खेळाडूच नाहीत. त्यात स्वतः सॅमसन, जोस बटलर, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल, डेव्हिड मिलर असा फलंदाजीचा भक्‍कम ताफा असला तरीही त्यांच्याकडे सातत्य नसल्याने दिल्लीचे काम सोपे होणार आहे.

त्यांच्या संघात यंदाच्या स्पर्धेतील सर्वात महागडा गोलंदाज ख्रिस मॉरिस असला तरीही त्याची गोलंदाजी दिल्लीच्या बलाढ्य फलंदाजीला कशी रोखणार हाच प्रश्‍न आहे. राहुल तेवतियासारखे अष्टपैलू खेळाडू संघात असले तरीही त्यांना दिल्ली संघाच्या तोडीस तोड कामगिरी करता येणार का याची शाश्‍वती देता येत नाही. या उलट दिल्ली संघ चांगलाच भरात आहे.

त्यांच्याकडे शिखऱ धवन व पृथ्वी शॉ अशी आक्रमक सलामीची जोडी आहे. त्यांनी यंदाच्या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यातही हे दोघे चांगलेच भरात असल्याने त्यांना पहिल्या सहा षटकांच्या पॉवरप्लेमध्ये जखडून ठेवण्याचे अशक्‍य कोटीतील कार्य राजस्थानच्या गोलंदाजांना करावे लागणार आहे.
ऍण्ड्रयू टाय व मुस्तफिजूर रेहमान ही गोलंदाजीची जोडी वेगवान असली तरीही त्यांनी यंदा फारशी समाधानकारक कामगिरी केलेली नाही.

दिल्लीची आघाडीची जोडी जरी अपयशी ठरली तरीही त्यांच्याकडे सर्वोत्तम पर्याय आहेत. शेमरन हेटमायर, अजिंक्‍य रहाणे, स्टिव्ह स्मिथ, मार्कस स्टोनिस असे तगडे फलंदाज आहेत. गेल्या वर्षी अमिरातीत झालेल्या स्पर्धेत स्टोनिसने दिल्लीला अनेक सामन्यांमध्ये एकहाती विजय मिळवून दिलेले आहेत.

दिल्लीच्या या खोलवर फलंदाजीसमोर राजस्थानच्या गोलंदाजांची कसोटी लागणार आहे. शेन वॉर्नच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघाने एकदा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. मात्र, त्यानंतर त्यांना सातत्याने अपयशाचा सामना करावा लागला आहे. आता हा सामना जिंकून ते यंदाच्या स्पर्धेत विजयी सलामी देतील का दिल्लीसमोर शरणागती पत्करतील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

मॉरिसकडे लक्ष
यंदाच्या स्पर्धेत सर्वात जास्त रकमेचा करार मिळालेला वेगवान गोलंदाज ख्रिस मॉरिस कशी कामगिरी करतो, यावरच राजस्थानचे यशापयश अवलंबून राहणार आहे. खरेतर मॉरिस यंदाच्या
स्पर्धेतील सर्वात ओव्हररेटेड खेळाडू मानला जात आहे. मूळचा दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू असूनही मॉरिसला राष्ट्रीय संघात स्थान टिकवून ठेवणे जमलेले नाही. त्यामुळे या स्पर्धेत त्याच्या कामगिरीकडेच लक्ष राहणार आहे.

सामन्याची वेळ
सायंकाळी :
7.30
ठिकाण ः वानखेडे स्टेडियम, मुंबई
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्‌सवर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.