मुंबई: आज मुंबई शेअर बाजारातील निर्देशांकाने सकाळच्या सत्रात जोरदार उसळी घेतली. दुपारी बारा वाजेपर्यंत निर्देशांकात तब्बल 1123 अंकाची वाढ होऊन तो 60,393 च्या आसपास पोचला होता. राष्ट्रीय शेअरबाजाराच्या निफ्टी निर्देशांकातही 300 अंकाची वाढ होऊन तो 17,969 च्या आसपास पोचला.
एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांच्या विलिनीकरणाच्या बातमीने निर्देशांकाला मोठे बळ मिळाले. एचडीएफसी बँकेचा शेअर सात टक्क्यांनी तर एचडीएफसीचा शेअऱ आठ टक्क्यांनी वधारला.
पाठोपाठ बजाज फायनान्स, टायटन, टेक महिंद्रा, एशियन पेन्टस् आणि एचसीएल टेक यांनीही निर्देशांकाला बळ दिले. त्यामुळे शेअरबाजाराची आठवड्याची सुरवात दणक्यात झालेली आहे.
एचडीएफसी समूहातील एचडीएफसी इन्व्हेस्टमेंटस् आणि एचडीएफसी होल्डींग्ज या कंपन्याचे एचडीएफसीमध्ये विलिनीकरण करण्यास आणि एचडीएफसीचे एचडीएफसी बँकेत विलीनकरण करण्यास संचालक मंडळाने मान्यता दिल्याचे एचडीएफसी बँकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.