नागरिकांच्या सृदृढ आरोग्यासाठी प्रयत्न केले – मुळीक

वडगावशेरी  – बदलत्या जीवन शैलीमुळे सर्वसामान्य नागरिक व्यायामापासून दुरावत आहे. कामकाज तसेच तणावामुळे अनेकांना आपल्या आरोग्याची काळजी घेता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नवीन उद्याने तसेच नागरिकांची सोय लक्षात घेऊन ठिकठिकाणी ओपन जिम सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचा लाभ हजारो नागरिक घेत असून त्याचा फायदा त्यांना होत आहे. भविष्यातही नागरिकांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार जगदीश मुळीक यांनी मतदारांना दिली.

मुळीक यांनी आज बरमाशेल, फायू नाईक चौक, टिंगरेनगर, सिद्धेश्‍वरनगर, सावंत पेट्रोल पंप आणि भीमनगरमध्ये पदयात्रेद्वारे प्रचार केला. यावेळी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्‍याम जाजू, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक कर्णेगुरुजी, नाना सांगडे, शीतल सावंत, राहुल भंडारे, फरजाना शेख, चंद्रकांत जंजिरे, विशाल साळी, सुधीर गलांडे, माजी नगरसेवक भगवान जाधव, भीमराव खरात, सागर माळकर, सुनील गोगले, अजय सावंत, अजहर खान तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

मुळीक म्हणाले, बागेत किंवा मोकळ्या मैदानावर चालणे किंवा जॉगिंग, पाण्यातील व्यायाम किंवा पाण्यात चालणे हा एक सर्व वयोगटातील लोकांसाठी उत्तम पर्याय आहे. व्यायामशाळेत जाणे अनेकांना आर्थिकदृष्ट्या परवड नाही. त्यामुळे मतदार संघामध्ये ओपन जिम सुरू केले आहे. येथे अनेक प्रकारचे व्यायाम करता येत आहे. याचा वापर तरुण, महिला तसेच वयोवृद्ध करत आहेत. यामुळे मतदार संघातील नागरिकांचे आरोग्य सुधारणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.