अनधिकृत भाजी विक्रेत्यांवर थेट गुन्हे दाखल होणार
पुणे – शहरात महापालिकेने नागरिकांच्या सुविधेसाठी 41 ठिकाणी भाजीपाला बाजार सुरू केला आहे. त्यानंतरही अनेक भाजीविक्रेते रस्त्यावर पथारी लावत आहेत. त्यामुळे नागरिक भाजी खरेदीसाठी रस्त्यावर येत असून गर्दी होत आहे. अशा विक्रेत्यांवर पालिकेने अतिक्रमण कारवाई केल्यानंतरही पुन्हा ते ररत्यावर येत आहेत. त्यामुळे आता त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली. तसेच, ज्या अन्नधान्य वितरण करणाऱ्या दुकानांच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंचे नियम पाळले जात नाहीत, अशी दुकाने बंद करून गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
शहरात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू असली तरी, करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे पालिका आणि पोलिसांकडून अर्धे शहर सील करण्याची वेळ आली आहे. या भागात ठराविक वेळेत दुकाने तसेच भाजीपाला उपलब्ध करून दिला जातो.
मात्र, त्या व्यतिरिक्त अनेक अनधिकृत भाजी विक्रेते रस्त्यावर तसेच गाड्यांमधून जाऊन सोसायटीत भाज्या विक्री करतात. या ठिकाणी कुठेही सोशल डिस्टन्सिंग पळले जात नाही. परिणामी काही भागांत किराणा माल विक्रेते आणि भाजी विक्रेत्यांना करोना झाल्याचे समोर आले आहे. ही बाब गंभीर असल्याने पालिकेने आता पोलिसांच्या मदतीने अशा विक्रेत्यांवर थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत.भाजी विक्रेत्यांप्रमाणे किराणा दुकानांची हीच स्थिती आहे.