देशभरात ईव्हीएम मशीन्सबरोबर छेडछाड ; मुंबईत विरोधकांची पत्रकार परिषद

मुंबई: आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी व्हीव्हीपॅटच्या ५० टक्के स्लीपची मोजणी करण्यात यावी अशी मागणी केली. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, त्यांनी Save The Nation, Save Democracy  या विषयावर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी प्रेझेंटेशन केले. तसेच भारतात निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीन रशियातून नियंत्रित केल्या जात आहेत, असा खळबळजनक आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केला.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार प्रफुल पटेल यांच्यासह आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, आपचे खासदार संजय सिंग, माकपाचे महेंद्र सिंग, तृणमूल काँग्रेसचे खा. नझमुल हक, सीपीआयचे प्रकाश रेड्डी, खुर्रम ओमर, डॉ. फर्नांडिस,  जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

आपण अनेक मतदारसंघात फिरलो असता लोकांचे मत सरकारविरोधी असल्याचे लक्षात आले. पण ईव्हीएम मशीन हॅक करुन, किंवा ईव्हीएम मशीनमध्ये घोळ करून सत्ताधारी मते मिळवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत खा. शरद पवार यांनी व्यक्त केले. काल प्रचाराची मुदत संपल्यानंतर शरद पवार यांनी बारामती मतदारसंघात थांबू नये, असे भाजपकडून निवडणूक आयोगाला सांगण्यात आले. खरंतर बारामतीमधील सभा झाल्यानंतर तिथे काही कार्यक्रम नव्हताच, पण तरिही बारामतीमध्ये माझे घर आहे, शेती आहे. पण तरीही मला माझ्या घरी थांबू देण्यावर आक्षेप घेण्यात आला, असेही पवार म्हणाले.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी देश वाचवा, लोकशाही वाचवा असा नारा या पत्रकार परिषदेत दिला. सत्तेकडून ईडी, आयकर विभाग, सीबीआय यांचा गैरवापर होत आहे. देशातील संस्थांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केला जात आहे. निवडणूक आयोग देखील याला अपवाद नाही, असा आरोप नायडू यांनी यावेळी केला. देशभरात ईव्हीएम मशीन्सबरोबर छेडछाड होत आहे. आम्ही मागच्या अनेक दिवसांपासून ईव्हीएम मशीन प्रकरणी अभ्यास करत आहोत. ईव्हीएम मशीन्सबाबत गैरहाताळणी होऊ शकते, असे निदर्शनास आल्याचे नायडू म्हणाले.
१९१ देशांपैकी फक्त १८ देशांनी ईव्हीएम यंत्रणा वापरली आहे. यातील अनेक देश विकसनशील देशात मोडतात.

बॅलटिंग पॉईंट, व्हिव्हिपॅट आणि कंट्रोल युनिट असे तीन डिव्हाईस सध्या मतदानासाठी वापरले जात आहेत. व्हिव्हिपॅटसाठी ९ हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. पोलिंग ऑफिसर आणि पोलिंग बुथवरील कर्मचारी हे तांत्रिकदृष्ट्या विकसित नाहीत. ईव्हीएम मशीनचे ऑडिट करणारे कुणी नाही. निवडणूक आयोगाने किमान ५० टक्के ईव्हीएम मशीन्स स्लीप चेक कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. इथे तांत्रिकदृष्ट्या कौशल्यप्राप्त लोक राहतात. त्यामुळे आम्ही मुंबईत पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतला, असेही ते म्हणाले.

मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. कृषी क्षेत्राचे नुकसान झाले आहे. देशभरातील शेतकरी या सरकारला कंटाळला आहे. युवकांना रोजगार नाही. उद्योजक कंटाळलेले आहेत. एखाद्या राजकीय पुढाऱ्याने जर आवाज उचलला तर त्याच्या घरी ईडी किंवा आयकर विभाग धाड टाकतो. सनदी अधिकाऱ्यांची देखील तीच अवस्था आहे, अशी टीकाही नायडू यांनी यावेळी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.