पावसाचा “अविश्रांत’ तडाखा

अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले : जनजीवन विस्कळित


रात्रभरात शहरात 42 मिलीमीटर पाऊस

विश्रांतवाडी/कात्रज – सोमवारी रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे कात्रज, पद्‌मावती तसेच लोहगाव परिसरातील काही भागात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळित झाले होते. यंदाच्या मोसमात अशाप्रकारे नागरी वस्तीमध्ये पाणी शिरल्याची ही दुसरी घटना आहे. शहर परिसरात सोमवारी रात्रभर तब्बल 42 मिलीमीटर पाऊस झाला तर लोहगावमध्ये तब्बल 56 मिलीमीटर पाऊस झाला.

मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. त्यानंतर ढग दाटून आले. रात्री 11 वाजता सुरू झालेला पाऊस रात्रभर सुरूच होता. यामुळे कात्रज येथून वाहणाऱ्या अंबिल ओढ्याला पुन्हा पूर आला होता. त्यामुळे कात्रज परिसरात ओढ्याच्या काठाला असणाऱ्या काही घरांच्या उंबऱ्यापर्यत पाणी आले. दि.25 सप्टेंबरला झालेल्या पावसाने पद्‌मवती येथील गुरुराज सोसायटीची सीमाभिंत पडली होती. ती अद्याप बांधली गेली नसल्याने आज अंबिल ओढ्याच्या पुराचे पाणी या सोसायटीत शिरले. त्यामुळे तळघरावर राहणाऱ्या नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्‍किल झाले होते. कात्रज घाट परिसरात पावसाचा जोर अधिक असल्याने अंबिल ओढा दुथडी भरून वाहत होता.

शहराच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या लोहगाव परिसरात मात्र या मुसळधार पावसाचा जनजीवनावर परिणाम झाला. सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे रहिवाशांच्या घरात आणि दारात पाणी शिरले होते. ओढे-नाले बुजविल्यामुळे याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. लोहगाव-वाघोली रस्त्यावरील कर्मभूमीनगर, योजनानगर, तसेच पोरवाल रस्त्यावरील स्वप्नसंकूल सोसायटी येथे पावसाचे पाणी घरात शिरले. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. या परिसरातील अनेक रस्ते सुद्धा जलमय झाल्याने वाहनांचे नुकसान झाले.योजनानगर येथील घरामध्ये पावसाचे पाणी शिरले होते. त्यामुळे घरगुती साहित्य, दुकाने भिजली. नाले बुजविल्यामुळे पाणी रस्त्यावर आले आहे. रस्त्याकडेला असणाऱ्या पावसाळी गटारे वारंवार मागणी करुन सुद्धा काढली नसल्याने ही स्थिती उद्‌भवली असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.