दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश असतानाही पिंपरी कॅम्पमधील अनेक दुकाने सुरू
पिंपरी – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि पिंपरी कॅम्पमधील दुकानांमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याने प्रशासनाने दोन दिवस पिंपरी कॅम्पमधील सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु प्रशासनाच्या आदेशाला हरताळ फासत अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडली.
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी कॅम्पातील दुकानात ग्राहक यांच्याकडून अटी-शर्तीचे उल्लंघन केले जात आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. मास्कचा वापर केला जात नाही. सम-विषम तारखेच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे पिंपरी बाजारपेठ दोन दिवस म्हणजेच गुरुवारपर्यंत पुन्हा बंद ठेवण्याचा आदेश महापालिका प्रशासनाने दिला आहे.
पिंपरी कॅम्प परिसरातील मुख्य बाजारपेठ, शगुन चौक, कराची चौक, साई चौक, आर्य समाज चौक, गेलार्ड चौक, डिलक्स चौक, संत गाडगे महाराज चौक या परिसरातील बाजार पेठ बुधवार व गुरुवार बंद ठेवण्याचे आदेश महापालिका ग क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे यांनी काढला आहे.
सोशल डिस्टंन्सिंग नियमांचे पालन करावे, सम-विषम तारखेनुसार दुकाने सुरू ठेवावे, गर्दी टाळावी या अटीनुसार पिंपरी कॅम्पातील दुकाने उघडण्यास महापालिका आयुक्तांनी परवानगी दिली होती. मात्र, कोणीही नियम पाळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिक मोठ्या संख्येने एकत्र जमत आहेत.
सामाजिक अंतराचे पालन होत नाही. मास्कचा वापर केला जात नाही. सम-विषम तारखांनुसार दुकाने सुरू ठेवण्याच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये करोनाचे संक्रमण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पिंपरी कॅम्प व परिसर बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. परंतु त्या आदेशालाही हरताळ फासत अनेकांनी दुकाने उघडली.