हडपसर – उत्तर प्रदेश येथील लखीमपुरची घटनेबाबत आज संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती. त्यानुसार आज हडपसर मध्ये तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी पदयात्रा, रॅली आणि चौकाचौकात भाषणे करून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जनतेला केले होते. त्याच पार्श्वभूमीवर हडपसर, मांजरी भागात महाराष्ट्र बंद ला संमिश्र प्रतिसाद असल्याचे चित्र दिसून आले.
दरम्यान, हडपसर येथील पंडीत जवाहरलाल नेहरू भाजी मंडईत कडकडीत बंद पाळत येथील व्यापारी व विक्रेत्यांनी आजच्या बंदला प्रतिसाद दिला. मगरपट्टा चौक ते पंधरा नंबर दरम्यानच्या व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली होती. तर काही दुकाने अर्धवट शटर ओढून सुरू होती. तसेच गाडीतळ, ससाणेनगर रस्ता, भाजी मंडई चौक, मगरपट्टा चौक याठिकाणी असलेली दुकाने पूर्णपणे बंद होती.संध्याकाळी अनेक दुकाने पुन्हा उघडण्यात आली होती. रिक्षा व बस व्यवस्था सुरळीत सुरू होती.