सोमेश्वरनगर (प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (एमएससी बँक) कर्जांचे वितरण करताना 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोप प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 70 जणांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व अजित पवार यांच्यावर ईडीच्या माध्यमातून गुन्हे दाखल झाल्याच्या निषेधार्थ सोमेश्वर नगर परिसरामध्ये बंद पाळण्यात आला. ‘एकच वादा अजित दादा’, ‘एकच साहेब पवार साहेब’ अशा घोषणा देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी करंजेपुल चौक येथे निषेध व्यक्त केला केली. सोमेश्वरनगरकरांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी होत आपले व्यवहार बंद ठेवले आहेत. मात्र औषधांची दुकाने दवाखाने यासारख्या अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू आहेत. सोमेश्वरनगर परिसरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना देखील आज सुट्टी देण्यात आली होती.