नाशिक : देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येच्या अर्धी संख्या ही राज्यात आढळून येत आहे. त्यातच कोविड रुग्णालयात रोज नव्याने रुग्णाची भरती होताना दिसत आहे. त्यामुळे आपल्या रुग्णाला भेटण्यासाठी नातेवाईकांनी एकच गर्दी केली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक महानगर पालिकेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. नाशिकमधील कोविड रुग्णालयात रुग्णांच्या भेटीसाठी जाणाऱ्या नातेवाईकांवर गुन्हे नोंदवण्याचा इशारा देण्यात आला आहे. रुग्णांच्या भेटीसाठी गर्दी करणाऱ्या नातेवाईकांना आवरण्यासाठी महापालिका आयुक्तांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
कोरोनाग्रस्त रुग्णांना जेवण देण्याच्या बहाण्याने किंवा इतर कारणांसाठी नातेवाईक येऊन भेटतात. हेच नातेवाईक शहरात सुपर स्प्रेडर ठरतात. नातेवाईक शहरात फिरत असल्याने कोरोना संसर्ग वाढत असल्याचा निष्कर्ष महापालिकेने काढला आहे. नाशिकमध्ये कोरोना संसर्ग वाढत असून रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.
सुरुवातीला एक हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. मात्र दंड करुनही ऐकले नाही तर थेट गुन्हे दाखल केले जावेत, असे आदेश नाशिक महापालिका आयुक्तांनी काढले आहेत. नाशिक शहरातील डॉ. झाकीर हुसैन, बिटको रुग्णालयांत कोरोना बाधित रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाईक गर्दी करत असल्याचे वारंवार समोर येत आहे.
दुसरीकडे, मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात ये-जा करणारे रुग्णांचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी व्हायरस प्रोटेक्शन प्रेशराईज चेंबरची’ उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांचे कोणत्याही विषाणूपासून (Virus) संरक्षण होईल. हे देशातील पहिले व्हायरस प्रोटेक्शन प्रेशराईज चेंबर आहे. वैद्यकीय शिक्षण संचलनालयाचे संचालक डॉ तात्याराव लहाने यांच्या हस्ते या चेंबरचे उद्घाटन करण्यात आले. हा प्रयोग वैद्यकीय क्षेत्रातील मोठी क्रांती मानली जात आहे.