युरोपीय संघ, तुर्की आणि ब्रिटनमधील प्रवाशांना “नो एन्ट्री’
नवी दिल्ली : करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची देशातील संख्या वाढायला लागल्यामुळे सरकारने प्रवास बंदीच्या निकषांना अधिक कडक केले आहे. युरोपीय संघातील देश, तुर्की आणि ब्रिटनमधील प्रवाशांच्या प्रवेशास सरकारने सोमवारी 18 मार्चपासून 31 मार्चपर्यंत बंदी घातली आहे.
करोना विषाणूची लागण झालेले ओडिशा, जम्मू काश्मीर, लडाख आणि केरळमध्ये प्रत्येकी एक, असे एकूण चार नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सोमवारी एकूण रुग्णांची संख्या 114 वर गेली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
या पॉझिटिव्ह रुग्णांशी संपर्क झालेल्या व्यक्तींच शोध घेण्यामुळे 5,200 हून अधिक संपर्कांची ओळख पटली असून त्यांच्या अरोग्यावर देखरेख ठेवण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
त्यामुळे सरकारने 31 मार्चपर्यंत सामाजिक उपाययोजना अधिक कडक केल्या आहेत, असे मंत्रीगटाच्या बैठकीनंतर मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना सांगितले. युरोपीय संघ, युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन, तुर्की आणि युनायटेड किंगडमच्या सदस्य देशांमधील प्रवाश्यांना 18 मार्च 2020 पासून भारतात प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे, या संबंधातील सूचना संबंधित विमान कंपन्यांना देण्यात आल्या आहेत, असे मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी सांगितले.
प्रतिबंधात्मक उपाय योजना…
करोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयान केले आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, खोकला आणि ताप असेल तर इतरांशी संपर्क टाळावा.
अशा स्थितीत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांकडे जाताना नाकातोंडावर मास्क बांधावा. हात धुतल्याशिवाय डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करु नये. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.
साबण लावून पाण्याने किंवा अल्कोहोलयुक्त सॅनिटाइझरने हात वारंवार स्वच्छ करावेत. शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड, रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकावे. वापरानंतर लगेचच टिश्यूपेपर केराच्या बंद टोपलीत टाकावा असे आवाहन आरोग्य मंत्रालयानं केले आहे.
हेल्पलाईन
दरम्यान केंद्र सरकारने नागरिकांसाठी 24 तास उपलब्ध असलेला 011 239780 46 हा दूरध्वनी मदत क्रमांक सुरु केला आहे. तसेच नागरिक 104 या क्रमांकावर आणि पर्लीें2019सारळश्र.लो या ई-मेल आयडीवरही संपर्क साधू शकतात.
महाराष्ट्रातही नागरिक करोनाविषयक मदतीसाठी 020 – 26127394 या राज्यस्तरीय तसेच मुंबई महानगरपालिकेच्या 1916 या मदत क्रमांकावर संपर्क करू शकतात. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने करोना संदर्भात 24 तास चालणारी हेल्पलाईन सुरू केली आहे.
परराष्ट्र प्रवक्ते रवीशकुमार यांनी एका ट्विटमध्ये ही माहिती दिली. नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक 1800118797 हा आहे. इतर क्रमांक असे आहेतः 911123012113, 911123014104 आणि 911123017905. फॅक्स क्रमांक 01123018158. र्लीेंळव19ाशर.र्सीें.ळप या ईमेल आयडीवर मेलही पाठवू शकतात.