सर्व पातळींवर प्रयत्न : महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
संबंधित सोसायट्यांत येणे-जाणे टाळण्याचे आवाहन
पुणे – शहरातील करोनाच्या नव्या बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन काम करत आहे. तसेच काही निर्बंधही वाढवण्यात येत आहे. जेथे रुग्ण अधिक आहेत, अशा 42 ठिकाणी मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहेत. हे कन्टेन्मेंट झोन ज्या इमारती अथवा सोसायट्यांमध्ये किमान 20 करोना बाधित आढळले आहेत अशाच ठिकाणी केले आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
शहरातील करोना रुग्णांची संख्या वाढत असताना प्रशासनाने रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. तसेच शाळा, महाविद्यालयांसह सर्व शैक्षणिक संस्था तूर्तास बंद आहेत. यापुढे जाऊन बाधित ज्या भागात आढळत आहेत, त्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच ज्या इमारती अथवा सोसायट्यांमध्ये 20 हून अधिक बाधित रुग्ण आढळले आहेत, अशा 42 सोसायट्या मायक्रो कन्टेंन्मेंट झोन म्हणून घोषित केल्या आहेत. शक्यतो या सोसायट्या अथवा इमारतींमध्ये बाहेरील व्यक्तीस निर्बंध घालण्यात आले असून सोसायटीतील नागरिकांनीही शक्यतो बाहेर जाणे टाळावे, अशी नियमावली केली आहे.