राज्यातील ‘या’ जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कठोर निर्बंध; बार, जीम, हॉटेल्स, सार्वजनिक उद्याने बंद

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

नांदेड : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. त्यातच काही जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु असल्याचे दिसत आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रकारचे हॉटेल्स, रेस्टोरेंट, खाद्यगृह, परमिट रूम, बेकरी, स्वीटमार्ट, चाट भांडार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.

दरम्यान, प्रशासनाच्या या निर्णयामुळे वरील आस्थापनांवर उपजिवीका अवलंबून असलेल्यांना अर्थिक अडचण येऊ शकते, हे लक्षात घेऊन तसेच नागरिकांच्या सोयीसाठी वरील आस्थापनांना पार्सल सेवा रात्री 10 वाजेपर्यंत ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व जीम, व्यायामशाळा, सार्वजनिक उद्याने 31 मार्चपर्यंत बंद राहतील, असे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोनाला रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी एकजुटीने मुकाबला करण्याची गरज आहे. त्यासाठी मास्क वापरणे, सतत हात धुणे आणि शारिरीक अंतर राखणे आवश्यक आहे. आपण याची काटेकोर अंमलबजावणी केली तर प्रशासनावर कठोर निर्णय घेण्याची वेळ येणार नाही. तसेच नागरिकांनी वरील त्रिसूञीचा अवलंब करून प्रशासनाला सहकार्य करावे आणि नांदेड जिल्हा कोरोनामुक्त करण्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी केले आहे.

तसेच या निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी केली, आणि कोविड-19 रूग्णांची संख्या कमी होऊ लागली तर परिस्थितीचा आढावा घेऊन या निर्णयांमध्ये 31 मार्च पूर्वी शिथीलता देण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.