पुणे – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ आदर्श आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क, पुणेच्या भरारी पथक क्र.१ आणि क्र. ३ यांनी कारवाई करीत अवैधरीत्या गावठी दारु निर्मिती, विक्री, वाहतूक आदी प्रकरणांत ७१ गुन्हे नोंदविले आहेत. यामध्ये २३ लाख ९२ हजार ५० रुपये किंमतीचा दारू बंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या पथकांमार्फत १५ ऑक्टोबरपासून अवैधरीत्या गावठी दारु निर्मिती, विक्री, वाहतूक, अवैध ताडी विक्री तसेच बेकायदेशीर देशी, विदेशी मद्य विक्री करणारे हॉटेल ढाबे आदी ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कालावधीत ७१ गुन्हे नोंदवून ६९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत दारु निर्मितीचे रसायन ६ हजार ८०० लिटर जप्त करण्यात आले.
यासह अन्य दारूसाठा तसेच ६ चारचाकी व १ दुचाकी वाहन असा एकूण २३ लाख ९२ हजार ५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत भरारी पथक क्र.१ व क्र.३ चे निरीक्षक देवदत्त पोटे, दुय्यम निरीक्षक डी. एस. सूर्यवंशी, पी.ए. कोकरे, वाय. एम. चव्हाण, पी.ए. ठाकरे तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक आदींनी भाग घेतला.
पकडलेला दारूसाठा…
– गावठी दारु २ हजार ६१६ लिटर
– देशी दारु ४२५ ब.लिटर
– विदेशी दारु २६२ ब.लि.
– बिअर ४५३ ब.लिटर
– ताडी ९१० लिटर
“भरारी पथका मार्फत कार्यक्षेत्रात तात्पुरते तपासणी नाके सुरू करण्यात आले असून अवैध मद्य वाहतुकीवर नजर ठेवण्यात येत आहे. यापुढे देखील आचारसंहिता कालावधीत अवैध मद्य विक्री, वाहतूक ठिकाणी पाळत ठेवून कारवाई सुरू राहील. अवैध मद्य निर्मिती, विक्री वाहतूकबाबत कोणास माहिती मिळाल्यास राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, पुणे विभागाशी तत्काळ संपर्क साधावा.” – देवदत्त पोटे, भरारी पथक निरीक्षक.