नवी दिल्ली – सध्या संपूर्ण जगभरात लोकांचे सोशल मीडिया वापरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. प्रत्येक जण फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ, रील आणि फोटो अपलोड वापर करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी आपले पोलीस बांधव देखील या गोष्टींचा वापर करून प्रसिद्धी मिळवत असतात.
परंतु या प्रकरणी बिहार राज्याच्या पोलीस प्रशासनाने कठोर पाऊले उचलले आहेत. बिहारमधील पोलिसांना ऑन-ड्युटी फेसबुक-इन्स्टा रील बनवण्यास बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश जारी करून ही बंदी लागू करण्यात आली आहे.
बंदी घालण्याचे कारण काय?
जारी करण्यात आलेल्या आदेशात असे म्हटले आहे कि ‘पोलीस ऑन ड्युटी असताना मोबाईलवर गप्पा मारण्यात किंवा रील बनवण्यात गुंतलेले असतात. त्यामुळे ते आपल्या कर्तव्यात 100 टक्के योगदान देत नाही. वाहन तपासणीसारख्या संवेदनशील कामातही पोलीस कर्मचारी मोबाईलमध्ये गुंतलेले असतात.
तसेच शस्रे, हातकडी यांचा वापर करत व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना ऑन ड्युटी मोबाईल वापरण्यास बंदी घातली आहे.
आता कोणी असे करताना आढळले तर त्याच्यावर विभागीय कारवाई केली जाईल तसेच त्याला नोकरीतून बडतर्फही केले जाणार आहे. दरम्यान, बिहार पोलीस प्रशासनाने या संदर्भात कारवाई सुरू केली आहे. तसेच या आदेशाचे पालन खुद्द पोलीस अधिकाऱ्यांकडून देखील केले जाणार आहे.