मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात पुरत्या अडकलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर आज (दि. 7) जामीन मंजूर झाला आहे. मात्र, शौविक चक्रवर्ती आणि परिवार यांचा जामीन अर्ज न्यायलयाने फेटाळला आहे. सुशांत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर रिया चक्रवर्तीला 8 सप्टेंबर रोजी भायखळा तुरुंगात तिची रवानगी करण्यात आली होती.
दरम्यान, जामीन मंजूर केला असून आता रिया चक्रवर्ती जेलमधून बाहेर येणार आहे. मात्र रिया बाहेर आल्यानंतर तिचा पाठलाग करु नये अशा सूचना मुंबई पोलिसांनी दिल्या आहेत.
पोलिसांच्या सांगण्यानुसार, रिया चक्रवर्तीचा कोणत्याही प्रकारचा पाठलाग, अडवणूक किंवा रस्त्यावर सिग्नलला गाडी उभी असताना जाऊन त्यांची मुलाखत किंवा व्हिजुअल्स घेणं कायद्यानं गुन्हा आहे. असं घडल्यास यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून अतिशय कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे आता कोणालाही रियाच्या जवळ फिरकता येणार नाही.
दरम्यान, रियाला 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला असून पुढील 10 दिवस 11 ते 5 या वेळेत रियाला जवळील पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.