सावधान! ‘कर्फ्यू’दरम्यान मोकाट फिरणाऱ्यांची पोलीस करणार ‘जेल’मध्ये खातिरदारी

लुधियाना – देशातील करोना परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारांतर्फे निर्बंध लादण्यात येत आहेत. मात्र काही ठिकाणी नागरिक अद्यापही गर्दी करताना आढळतायेत. नागरिकांनी एकत्र जमू नये व करोना संसर्गाला आळा बसावा यासाठी लुधियाना पोलिसांनी आता कठोर पावलं उचलली आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लुधियाना शहरात दुपारी १२ ते सायंकाळी ५ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यावेळेत जर कोणी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर फिरताना आढळल्यास त्यांना दंडात्मक कारवाईबरोबरच ‘जेलची’ हवा खावी लागणार आहे.

मोकाट फिरणाऱ्यांची खातिरदारी करण्यासाठी लुधियाना पोलिसांनी शहरात चार नवी कारागृहे देखील उभारली आहेत. ही कारागृहे शहरातील बहादूर के रोडवरील नवीन एसडी स्कूल, पखोवाल रोड येथील इनडोअर स्टेडियम, मोती नगरातील गुरु नानक स्टेडियम आणि वाल्मिकी भवन येथे उभारण्यात आलीत. याबाबत लुधियानाचे पोलीस उपायुक्त वरींदर कुमार शर्मा यांनी माहिती दिली.

दरम्यान, लुधियाना पोलिसांच्या या निर्णयाचे समाज माध्यमांवर जोरदार कौतुक होत असून करोनावर नियंत्रणासाठी देशात सर्वत्र अशाप्रकारची कारवाई करणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.