महामार्गालगत विदेशी मद्याची विनापरवाना सर्रास विक्री
ओतूर – येथे एसटी बसस्थानकानजीक नगर-कल्याण महामार्गालगत नुकत्याच सुरु झालेल्या एका बिअर शॉपी दुकानात फक्त बिअर व वाईन विक्रीचा परवाना असताना त्यासोबत विनापरवाना विदेशी मद्याचीही विक्री सर्रासपणे होत होती. राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनी पाहणी करुन येथे बिअर शॉपीच्या नावाखाली अनधिकृतरित्या सुरु असलेल्या विदेशी मद्य विक्रीबाबत चौकशी करून कारवाई केली याबाबत या विभागाचे निरीक्षक जी. डी. कुचेकर यांनी जुजबी माहिती दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून चौकशी (धाड) झाल्यावर या बिअर शॉपीमध्ये विनापरवाना खुलेआम विदेशी मद्यविक्री होत असल्याचे आढळून आले असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळाली. उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत पकडलेल्या विविध कंपन्याच्या विदेशी मद्याचा नेमका किती साठा हाती लागला त्याबाबत उशिरापर्यंत कारवाई सुरु राहिल्यामुळे पुरेशी माहिती मिळू शकली नाही. निरीक्षक कुचेकर यांनी विभागीय नियमभंग प्रकरणी नोंद केली असून त्याबाबत जागेवरच दोषारोप पत्र दिल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.
दरम्यान हे गजबजीचे ठिकाण असल्याने या प्रकाराची सर्वत्र चर्चा आहे. तर तालुक्यात अशा प्रकारे अनेक ठिकाणी विनापरवाना मद्यविक्री होत असल्याबाबतची एवढी उघडपणे चर्चा होत असूनही राज्य उत्पादन शुल्क विभाग गप्प का? राज्य उत्पादन शुल्क विभागाची जुजबी कारवाई होऊन गेल्यावर पुन्हा “जैसे थे’ परिस्थिती तयार का होते? हे असे प्रश्न अनुत्तरितच राहात असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.