पिंपरी – सध्या उन्हाळा वाढत असल्याने दुचाकीचालकांना डोळ्याचा त्रास होतो. या त्रासापासून वाचण्यासाठी अनेकजण गॉगल्स वापरतात. शहरात ठिकठिकाणी रस्त्रूावर गॉगल्स विकणारे दिसून येत आहेत. पण या गॉगल्समुळ संरक्षण कमी आणि त्रास अधिक होण्याची शक्यता आहे.
उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक गॉगल्सचा वापर करताना दिसतात. शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर गॉगल्स विक्रेते दिसतात. त्यांच्याकडे काळ्या, निळ्या व अन्य रंगाच्या काचांमध्ये गॉगल्स विकण्यासाठी पाहण्यास मिळतात. लहान मुलांसाठी 40 ते 70 रुपये तर, मोठ्यांसाठी 100 रुपयांपर्यंत हे गॉगल्स मिळतात.
त्यामुळे साहजिकच त्यांना नागरिकांकडून मागणीही चांगली असते. ज्यांना चष्म्याचा नंबर आहे, त्यांनी अशा प्रकारचे गॉगल्स वापरणे त्यांच्या डोळ्याला त्रासदायक ठरू शकते. तर, ज्यांना चष्म्याचा नंबर नाही मात्र उन्हापासून बचावासाठी ते गॉगल्स वापरत असतील तर त्यांनी नोंदणीकृत ऑप्टोमेट्रीस्टकडूनच गॉगल्स घ्यायला हवे, असा सल्ला नेत्र चिकित्सक देत आहेत.
डोळ्यांचे आरोग्य जपणे हे खूप गरजेचे आहे. ज्यांना चष्मा आहे त्यांनी रस्त्यावरील गॉगल्स वापरल्यास त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. तसेच, ज्यांना चष्म्याचा नंबर नाही त्यांनाही या गॉगल्समुळे त्रास होऊ शकतो. कारण, रस्त्यावरील गॉगल्सविषयी आपण खात्री देऊ शकत नाही. नागरिकांनी नोंदणीकृत ऑप्टोमेट्रीस्टकडून गॉगल्स घ्यायला हवे.
– डॉ. प्रकाश रोकडे,जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक