प्रवाह : चला पाऊस होऊ

विजय शेंडगे

दरवर्षी पावसाळ्यात मी आभाळाला पाऊस होताना पाहतो. आभाळ पाऊस होतं म्हणजे काय करतं? रिमझिम होऊन बरसतं. त्याच्या ओंजळीत आहे ते सर्व देतं. रितं होतं. पुन्हा समुद्राकडून वाफ घेतं. आपल्या ओंजळीत साठवतं. पुन्हा पाऊस होतं. आभाळाकडे घेण्याची वृत्ती आहे आणि देण्याचं भान आहे. माणसाप्रमाणे आभाळाला साठवता येत नाही. तो स्वभावच नाही त्याचा. माणूस मात्र फक्‍त घ्यायला शिकला. साठवायला शिकला. द्यायचं म्हटलं की माणसाच्या हाताला दुष्काळ पडतो. आभाळाला दुसऱ्याची तृष्णा भागवण्यात आनंद लाभतो आणि माणसाला स्वतःची भूक भागवण्यात. तहान तशी लहान असते. घसा ओला झाला की तहान भागते. भूक मात्र मोठी असते. ढेकर येईल तेव्हाच माणसाचं समाधान होतं. आज ढेकर दिली म्हणून माणूस समाधानी होत नाही. त्याला उद्याची चिंता असते, परवाचा घोर असतो. पुढच्या पिढ्यांची काळजी असते. म्हणून माणूस साठवून ठेवतो. पण तसे करत असताना तो पुढल्या पिढ्यांची मनगट निकामी करतो. मागच्या पिढीनं साठवून ठेवलं कि पुढची पिढी दुबळी होते.

पाऊस येतो गारा देतो. पाऊस येतो ओढ्यांना खळखळाट देतो. पाऊस येतो नद्यांना पूर येतो. ओढे, नाले, नद्या पाऊस घेतात समुद्राला देतात. समुद्र मात्र सगळा पाऊस आपल्यात सामावून घेतो. कितीही पाऊस पडला तरी समुद्राला पूर आल्याचं मला आठवत नाही. समुद्र जेवढा अथांग तेवढीच त्याची सामावून घेण्याची क्षमता. मला माणसाची घेण्याची भूक समुद्रासारखी वाटते. कितीही घेतलं तरी माणसाच्या घेण्याच्या वृत्तीला पूर येत नाही. माणसाची ओंजळ ओसंडून वहात नाही. फाटक्‍या झोळीसारखी असते माणसाची वृत्ती. कितीही ओता ती झोळी भरत नाही कधीच. कारण माणसाकडे दातृत्व नाही. निसर्गाकडे पहा ना. तो समाधानी आहे. कारण देणं ही निसर्गाची वृत्ती आहे. एकाला द्यायचं आणि दुसऱ्याला नाही असं निसर्ग करत नाही. पाऊस पडताना गरीब-श्रीमंत बघत नाही, शहर-गाव बघत नाही. दलित-सवर्ण बघत नाही. हिंदू-मुस्लीम बघत नाही. भेदाभेद करणं हा धर्म नाही पावसाचा. पाऊस नव्हे अवघा निसर्ग भेदाभेद करतच नाही मुळी. पाऊस पशुपक्ष्यांसाठी जसा पडतो तसाच प्राणिमात्रांसाठी सुद्धा पडतो. सगळ्यांच्या ओंजळी ओल्या करतो. कुणाला नाउमेद करत नाही. कुणाला नाही म्हणत नाही. तो जंगलात पडतो आणि उघड्या माळावर सुद्धा पडतो. माझ्या ओंजळीत आहे ते याचकांच्या ओंजळीत द्यायचं एवढंच ठाऊक असतं त्याला. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यातलं सुख पावसाला विचारावं.

पाऊस आनंद वाटतो आणि माणूस स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्याचा आनंद हिरावून घेतो. पावसाला मातीत कोसळताना दुःख होतं नाही आणि काश्‍मिरात पडताना आनंद होत नाही. तो मातीत कोसळतो. मातीकडून मृदगंध घेतो. तो मृदगंध आभाळत उधळून देतो. माणसाला इतक्‍या सहजासहजी आनंद वाटता आला. सुख उधळता आलं तर सगळ्यांचं आयुष्य किती सुखमय होईल. मेघ काळे होतात रिमझिम धारा येतात तेव्हा जंगलातला मोर पिसारा फुलवून नाचतो. गाई गुरे आनंदाने शेपट्या उंचवत उधळतात. पाखरं भिजल्या पंखाने फांदीवर बसून लुकलुक डोळ्यांनी पाऊस न्याहळत राहतात. बाया बापड्या पागोळ्याआडून रानात गेलेल्या कारभाऱ्याची वाट पाहतात. ओढ्याच्या तळाशी रमणारी मासोळी पाण्यावर येते. क्षणभर पाण्याबाहेर तोंड काढून डोळे भरून पाऊस पाहते. बिळातले खेकडे बाहेर पडतात. मुंग्या मात्र वारूळ धरून बसतात. झाडंझुडपं पावसात मनसोक्‍त न्हातात. वाळल्या गवताला हिरवे धुमारे फुटू लागतात. कितीतरी दिवस बियाणाच्या कुशीतल्या पाय मुडपून पडून असलेल्या अंकुराला जन्म घेण्याची ओढ लागते. इतके सारे आणि आणखी कितीतरी बदल केवळ पावसामुळे होतात. सारेच बदल आनंददायी. सुखाची पखरण करणारे. त्यामुळेच कित्येकदा मला पाऊस व्हावंसं वाटतं.

‘घन घन माला नभी दाटल्या कोसळतो धारा
केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा.’
हे गीत गदिमांनी लिहिलं तेव्हा असाच पाऊस पडत असावा. आणि त्यांच्या मनाला आनंदवेदना होत असाव्यात. आई प्रसूतीकळा सोसून बाळाला जन्म देते. आणि बाळाचं रडू ऐकू येताच तिच्या चेहऱ्यावर हसू उमलतं. वरील ओळी लिहिताना गदिमांची अवस्थाही तशीच असावी. बाळाला जन्म देणाऱ्या आईसारखी. पाऊस पडतो तेव्हा ढगांनाही अशाच आनंददायी वेदना होत असाव्यात. काळ्याभोर नभातून थेंब जन्म घेतात. पाऊस होऊन धरतीवर येतात. धरती त्या थेंबांना मांडीवर घेते. जोजवते. असा आभाळात जन्म घेणारा आणि धरेवर नांदणारा पाऊस मला कृष्णाचंच रूप वाटतो. कृष्ण नाही का, द्वारकेत जन्मला आणि मथुरेत नांदला. ‘नको नको रे पावसा असा धिंगाणा यावेळी’ हे इंदिरा संतांचे शब्द देखील पावसावरील लटक्‍या रागापोटी आले असावेत. ‘किती रे त्रास देतोस!’ असं म्हणत एखाद्या आईने लाडाने आपल्या बाळाचे गाल धरावेत तसे. पण आतून मात्र त्यांना पाऊस नक्कीच आनंद देऊन गेला असेल. इंदिरा संतांच्या या कवितेतल्या पावसातही मला बाळकृष्णच दिसतो. गौळणींच्या खोड्या काढणारा. त्यांच्या दह्या-दुधाची चोरी करणारा. कितीही सांगितलं तर आपल्याला हवं तसंच वागणारा. इंदिरा संतांच्या कवितेतला पाऊसही तसाच ‘नको, नको’ म्हणत असताना येणारा, कौलातून गळणारा, त्यांचं जुनेर भिजवणारा. नटखट कृष्णच जसा. आणि इंदिराबाई यशोदामैय्या.

मी असा पावसाला सुख वाटत फिरताना पाहतो तेव्हा मला वाटतं आपणही पाऊस व्हावं. आपण पावसाचं प्राक्‍तन घ्यावं, आनंदाचं उधाण व्हावं. पाऊस देत राहतो आनंद पेरत जातो. तसाच आपणही आनंद पेरत जावं. आनंदाचा प्रवाह व्हावं. कुणीतरी यावं त्याच्या अपेक्षांची होडी आपल्या प्रवाहात सोडून द्यावी. आपण ती प्रेमाने पुढे न्यावी. पाऊस जसा ज्याला ज्याला स्पर्श करतो त्याला त्याला आनंद देतो तसाच आपणही आपल्या भोवतालच्या सगळ्यांना आनंद द्यावा. चला तर मग पाऊस होऊ. पावसाकडून देण्याची वृत्ती घेऊ. माणुसकीचं गाणं गाऊ.

Leave A Reply

Your email address will not be published.