प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 2 – शहर आणि विशेषत: उपनगरांतील भटक्या डुकरांची संख्या आणि उपद्रव वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यात महापालिका कमी पडत आहे. या डुकरांचे प्रजनन वेगाने होत असल्याने नागरिकांना उपद्रव सहन करावा लागत आहे. डुक्कर पकडण्याची कारवाई सध्या मंदावल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून दिसून येते.
शहरात डुकरांची संख्या वाढत असल्याने संसर्गजन्य आजार तर वाढतातच, शिवाय स्वच्छतेच्या बाबतीत मोठी समस्या निर्माण होते आणि परिसराचे सौंदर्य बिघडते, अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिली आहे. तर, दुसऱ्या बाजूला डुक्करपालन करणारे व्यावसायिक पालिकेच्या कारवाईला विरोध करतात. पुन्हा हेच व्यावसायिक या डुकरांना रस्त्यावर सोडतात. ते उकीरड्यावर अन्नाच्या शोधात फिरतात. त्याचा स्थानिक रहिवाशांना त्रास होत असल्याची स्थिती आहे.
पालिकेने दररोज सुमारे 30-35 भटक्या डुकरांना पकडण्याचे लक्ष्य ठेवले आहे, जे राज्य शासनाच्या निकषांवर आधारित आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ जे कत्तलखान्याच्या क्षमतेवर आधारित आहे. तसेच कोणतीही क्रूरता होणार नाही याची आम्हाला काळजी घ्यावी लागते. जेव्हा आम्हाला नगरसेवक किंवा नागरिकांकडून कोणतीही तक्रार येते तेव्हा आम्ही दखल घेतो.
– डॉ. सारिका फुंडे, सहायक पशुवैद्यकीय अधिकारी
कालावधी – पकडलेले डुक्कर
नोव्हेंबर – 2,105
डिसेंबर 2021 – 1,339
जानेवारी 2022 – 1,324
फेब्रुवारी – 997
मार्च – 1,113
एप्रिल – 1,103
मे – 1,140
जून – 1,122