पुणे -महापालिकेकडून शहरातील भटक्या मांजरांवरही नसबंदीची शस्त्रक्रीया केली जाणार आहे. यासाठी सुमारे 1 कोटी 20 लाख रुपयांचा खर्च येणार असून त्यास बुधवारी स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी दिली.
शहरातील भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेकडून त्यांची नसबंदी शस्त्रक्रीया व लसीकरण केले जाते. शस्त्रक्रीयेनंतर पुन्हा ती पकडलेल्या ठिकाणी सोडली जातात. याच धर्तीवर आता भटक्या मांजरींचीही नसबंदी शस्त्रक्रीया व लसीकरण केले जाणार आहे. यासंबंधिचे पत्र ऍनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. भटक्या मांजरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी लसीकरण करणे व त्यांची संख्या मर्यादित राहण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही कार्यवाही भारतीय जीव जंतू कल्याण मंडळाने केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने करण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचे आदेश दिले आहेत. या कामासाठी 5 वर्षांची स्वतंत्र निविदा काढण्यात येणार आहे.