राष्ट्रवादीकडून “घरवापसी’साठी व्यूहरचना

अजित पवार, जयंत पाटील यांच्यावर सोपविली जबाबदारी

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नातू आणि पक्षाचे युवा नेते पार्थ पवार यांना फटकारल्यामुळे राज्यात राजकीय चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी राज्यात एक मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना परत आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून व्यूहरचना आखण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात काल (बुधवारी) एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत नेत्यांच्या घरवापसीबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील तीनही पक्षाचे राजकारण, पक्षाची ताकद पाहून गयारामांना पुन्हा प्रवेश दिला जाणार असल्याचे समजते. 

राष्ट्रवादीतील गयारामांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्याची जबाबदारी शरद पवारांकडून अजित पवार, जयंत पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. लवकरच राष्ट्रवादीत काही भाजप आमदारांच्या प्रवेश करून घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आमदारांना पुन्हा पक्षात घेताना राष्ट्रवादीकडून शिवसेना आणि कॉंग्रेसला विश्वासात घेतले जाईल, असेही बोलले जात आहे.

एकीकडे पार्थ पवार यांच्या निमित्ताने भाजपचे नेते राष्ट्रवादीतील अंतर्गत वादावर टोला लगावत असतानाच राष्ट्रवादी ही व्यूवरचना आखत आहे. त्यामुळे आता भाजपला डॅमेज कण्ट्रोलसाठी प्रयत्न करावे लागणार की काय, अशी शक्‍यता निर्माण झाली आहे.

आमच्या संपर्कात भाजपचे काही आमदार असतील तर आम्ही काही असे जाहीररित्या सांगणार तर नाही ना! जर भाजपचे कोणी आमदार आमच्याकडे आले तर त्यांना राजीनामा देऊन त्यांना यावे लागेल, ते आमच्याकडे आले तर ते निवडून येऊ शकतात, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे.

पार्थ पवार नाराज?
दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्‍तव्यानंतर पार्थ पवार कमालीचे अस्वस्थ असून काही मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्‍यता आहे. शरद पवारांनी जाहीरपणे फटकारल्यानंतर पार्थ यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसल्याचे त्यांच्या समर्थकांना वाटते. त्यातच आज सकाळी खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

या भेटीनंतर त्यांनी थेट अजित पवार यांची भेट घेवून चर्चा केली. त्यामुळे विविध चर्चा रंगत आहे. दरम्यान, अजित पवारांनी मोठ्या आत्मविश्वासाने पार्थ यांना लोकसभा निवडणुकीच्या काळात लॉंच केले होते. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला त्यानंतरही राष्ट्रवादीत वादळ निर्माण झाले होते. विधानसभा निवडणकीनंतर अजित पवारांनी बंड केले होते. त्यामुळे पार्थ पवार कुठला निर्णय घेतात याकडे आता राजकीय निरिक्षकांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.