क्रिकेट काॅर्नर : टाइम घेऊन कसली स्ट्रॅटेजी ठरवता

-अमित डोंगरे

आयपीएल स्पर्धेत गेल्या काही वर्षांपासून अनेक नव्या गोष्टींचा समावेश करण्यात आला. त्यातील एक बाब म्हणजे स्ट्रॅटेजीक टाईम आऊट. सामना सुरू झाला की फलंदाजी व गोलंदाजी करत असलेल्या संघांना आपल्या मागणीनुसार हा स्ट्रॅटेजीक टाइम आऊट घेण्याची परवानगी असते. मात्र, यंदा अमिरातीत होत असलेल्या आयपीएल स्पर्धेत हा अडीच मिनिटांचा ब्रेक नक्‍की कशासाठी आहे हाच प्रश्‍न पडतो.

खरेतर दोन्ही संघांना सामन्यादरम्यान आपल्याकडून काय चुका झाल्या त्याबाबत चर्चा करण्यासाठी तसेच उर्वरित खेळात काय योजना आखायच्यासाठी वेळ दिला जातो. इथे मात्र, त्याचा उद्देशच स्पष्ट होत नाही. यंदाच्या स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यांतील प्रत्येक संघांचा खेळ पाहता खुद्द कर्णधार देखील त्यांच्याशी काही चर्चा करतात का नाही असा प्रश्‍न पडतो.

या स्ट्रॅटेजीक टाइम आऊटला बास्केटबॉल या खेळात सर्वप्रथम स्थान मिळाले. मात्र, त्याचा उपयोग व्यावसायिक कारणांसाठीच केला जाणार असे सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आले होते. आता आयपीएलमध्येही त्याचा पायंडा पडलेला आहे. 6 ते 9 या षटकांमध्ये किंवा 13 ते 16 या षटकांच्या दरम्यान या ब्रेकची मागणी खेळाडू करू शकतात. गोलंदाजी करत असलेल्या संघाला 6 ते 9 ही षटके तर फलंदाजी करत असलेल्या संघाला 13 ते 16 ही षटके हा ब्रेक घेण्यासाठी दिली जातात.

या स्पर्धेचा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला व त्यावेळी घेण्यात आलेल्या या ब्रेकमध्ये खेळाडू चक्क एकमेकांची थट्टा मस्करी करताना दिसले. त्यात कोणतीही गंभीर चर्चा केली जात नसल्याचे त्यावेळीही स्पष्ट दिसून आले. अर्थात, बीसीसीआय, आयपीएल समिती, अमिराती क्रिकेट संघटना यावर उघडपणे बोलणार नाहीत हे सर्वश्रुत आहे. त्यामागे व्यावसायिक कारण आहे हे कोणीही सांगू शकेल.

बास्केटबॉल या खेळात हा ब्रेक जेव्हा द्यायला सुरुवात झाली तेव्हा त्यासाठी साडेसात मिनिटे अधोरेखित करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी सामना विनाकारण लांबला जातो हे लक्षात आल्यावर ही वेळ अडीच मिनिटांची करण्यात आली. हेच सूत्र आयपीएलमध्ये 2009 सालापासून सुरू करण्यात आले.

या ब्रेकमुळे टी-20 क्रिकेटच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे व हेच आयोजकांनाही लक्षात येत नाही याचेही आश्‍चर्य वाटत आहे. मूळात कसोटी सामने निकाली होत नव्हते, तसेच जवळपास 90 टक्के सामने अनिर्णितही राहात होते, त्यामुळे त्याचा प्रेक्षकवर्गही कमी होऊ लागला होता. जी गत कसोटी सामन्यांची होत होती तीच अवस्था एकदिवसीय सामन्यांबाबतही होऊ लागली.

नोकरदार व्यक्‍ती घरी आल्यावर पुन्हा सहा ते सात तास चालणारे सामने पाहण्याची तसदीही घेत नसल्याचे लक्षात आले व या सगळ्यात फुटबॉल, टेनिसचे केवळ दोन ते तीन तासांत संपणारे सामने जास्त लोकप्रिय होऊ लागले. ज्या देशात क्रिकेटचा जन्म झाला त्याच इंग्लंडमध्ये क्रिकेटच्या लोकप्रियतेलाच ओहोटी लागली. यातून मार्ग काढण्यासाठी क्रिकेटच्या सामन्यांना प्रेक्षक मिळावे व सामनाही लवकर संपावा तसेच निकाली निघावा याच कल्पनेतून टी-20 क्रिकेटचा जन्म झाला. आता तर काय 10 षटकांचेही सामने इंग्लंडमध्ये सुरू झाले आहेत.

हा क्रिकेटचा प्रकार सुरू झाला तो फास्टगेम या धर्तीवर मात्र, या टाईम आऊटमुळे हे सामनेही आता 2 तास 50 मिनिटे नव्हे तर साडे तीन तास चालत असल्याने हा ब्रेक असावा का असा प्रश्‍नही निर्माण झाला आहे. नोकरदार व्यक्‍तीला समोर ठेवून या टी-20 ला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे हे सामने तीन तासांपेक्षा कमी कालावधीत संपले पाहिजेत हा दृष्टीकोन असायला हवा.

गेल्या वर्षी तर आयपीएल स्पर्धेतील सामने रात्री 12 काय 2 काय मध्यरात्रीपर्यंतही चालल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे दोन्ही संघांना या टाईम आऊटचा काहीही लाभ होत नसल्याने केवळ व्यावसायिक गणितांसाठी हा प्रकार सुरू आहे. आता तर सोशल मीडियावरही या ब्रेकला कात्री लावा व सामना वेळेवर पूर्ण होइल याकडे लक्ष द्या अशा सूचनाही येऊ लागल्या आसल्याने आयपीएलच्या पुढील मोसमापासून का होईना पण या स्ट्रॅटेजीक टाईम आऊटलाच टी-20 क्रिकेटमधून आऊट करण्यात येणार का हाच प्रश्‍न आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.