पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या “वायसीएम’ रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहातून एका महिलेचा मृतदेह बदलला गेला. यावरून मयत महिलेच्या नातेवाइकांनी “वायसीएम’ रुग्णालयामध्ये गोंधळ घातला. नातेवाइकांनी वायसीएमचे अधिष्ठाता यांच्या कार्यालयात तोडफोड करून निषेध व्यक्त केला. संतप्त नातेवाइकांची गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी अधिकची कुमक मागवली असल्याने “वायसीएम’ परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
स्नेहलता अशोक गायकवाड (वय 57, रा. दापोडी) यांच्या अंगावर मंगळवारी सायंकाळी भिंत कोसळली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना सुरुवातीला औंध येथील रुग्णालयात नेण्यात आले. तिथून त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी स्नेहलता गायकवाड यांचा मृतदेह पिंपरी येथील “वायसीएम’ शवविच्छेदनगृहात पाठविण्यात आला.
काही तासांत मृतदेह गायब
स्नेहलता यांच्या मृतदेहाचे मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास विच्छेदन करण्यात आले. बुधवारी मध्यरात्री शवविच्छेदनगृहात तीन महिलांचे मृतदेह होते. पहाटे तीन वाजताच्या सुमारास स्नेहलता यांच्या नातेवाइकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. परंतु त्यांचे नातेवाइक गुजरात येथून येत असल्याने त्यांच्यावर बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. त्यामुळे स्नेहलता यांचे नातेवाईक बुधवारी सकाळी सात वाजता पुन्हा त्यांची पाहणी करून गेले. त्या वेळी देखील स्नेहलता यांचा मृतदेह शवविच्छेदनगृहात होता. मात्र, अकरा वाजताच्या सुमारास त्यांचे नातेवाईक अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आले. मृतदेह घेऊन जाताना तो मृतदेह स्नेहलता यांचा नाही हे नातेवाइकांच्या लक्षात आले. नातेवाइकांनी शवविच्छेदनगृहात जाऊन पाहणी केली असता स्नेहलता यांचा मृतदेह तेथे नसल्याचे उघड झाले.
“वायसीएम’मध्ये तणावाची परिस्थिती
संतप्त नातेवाइकांनी “वायसीएम’ रुग्णालयात गोंधळ घातला. नातेवाइकांनी वायसीएम कार्यालयाचे अधिष्ठाता कार्यालयाची तोडफोड केली. संतप्त नातेवाइकांची गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी अधिकची कुमक मागविली. “वायसीएम’ परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. स्नेहलता यांचे नातेवाईक सकाळी 11 वाजता येण्यापूर्वी दोन मृतदेह देण्यात आले आहेत. त्या दोन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले आहेत. त्यामुळे स्नेहलता यांचा मृतदेह कुठे गेला याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत.