वानवडीतील गुन्हेगारांनी बनवले ‘विचित्र’ शस्त्र; मारहाण करुन लूटली रोकड

पुणे – रस्त्यावर लूटालूट करणारे आजवर लाकडी दांडके, लोखंडी रॉड, हॉकिस्टीक किंवा कोयत्याचा वापर करत होते. मात्र वानवडीतील काही गुन्हेगारांनी स्वत: एक विचित्र शस्त्र बनवले आहे. त्यांनी लाकडी दांडक्‍याला टोकदार खिळे लावले आहेत. याचा वापर करत एका उत्तर प्रदेशातील व्यक्तीस मारहाण करुन लूटले. यानंतर रस्त्यावर लावलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली.

याप्रकरणी ज्वाला शंकर यादव (रा.कोंढवा, मु.उत्तर प्रदेश) यानी दिलेल्या फिर्यादीनूसार गणेश पोपट जाधव (19, रा.घोरपडे पेठ), तुषार लोखंडे (19, रा.वानवडी), जॉन आणि त्यांच्या एका अनोळखी साथीदाराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्वाला यादवच्या ओळखीच्या गणेश जाधव याने लोखंडी खिळे लावलेले दांडके सोबत आणले होते. हे दांडके ज्वालाच्या डोक्‍यात मारुन त्याच्या खिशातील अडीच हजाराची रोकड जबरदस्तीने चोरण्यात आली. यानंतर दुचाकीवरुन आलेल्या त्याच्या तीन साथीदारांनीही लोखंडी खिळे असलेल्या दांडक्‍याने त्याच्या पाठीवर आणि हातावर मारहाण केली.

तसेच, जाताना ज्वालाच्या दुचाकीवर दगड मारुन हेड लाईट आणि फायबरची बॉडी तोडून पाच हजाराचे नुकसान केले आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कांबळे करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.