जयपूर -बहुजन समाज पक्षाच्या (बसप) राजस्थान शाखेने शनिवारी 6 आमदारांसाठी पक्षादेश जारी केला. त्यानुसार, पक्षाने संबंधित आमदारांना राज्यसभा निवडणुकीत केवळ अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांना मतदान करण्याचा आदेश दिला. मात्र, संबंधित आमदारांनी याआधीच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राजस्थान बसपचा आदेश अजब स्वरूपाचा ठरला आहे.
राजस्थानात 2018 मध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत बसपचे 6 उमेदवार विजयी झाले. मात्र, त्यांनी सप्टेंबर 2019 मध्ये बसप विधिमंडळ पक्ष सत्तारूढ कॉंग्रेसमध्ये विलीन केला. त्यामुळे बसपचे सर्व आमदार कॉंग्रेसचे सदस्य बनले. आता राजस्थानमधून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या 4 जागांसाठी 10 जूनला निवडणूक होणार आहे.
अशात बसपने संबंधित आमदारांसाठी पक्षादेश जारी केला आहे. कॉंग्रेस आणि भाजपच्या धोरणांना आमचा विरोध आहे. त्यामुळे संबंधित आमदारांनी अपक्ष उमेदवाराला मतदान करावे, असे राजस्थान बसपने बजावले आहे.
बसपच्या सर्व आमदारांनी याआधीच विधिमंडळ पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन केला. त्यामुळे त्या आमदारांबाबत बसपची कुठली भूमिका उरलेली नाही. बसपचा पक्षादेश मानणे त्या आमदारांना बंधनकारक नाही, असे तज्ञांचे मत आहे.